गणेशोत्सवात मोठी गुड न्यूज! साखरेच्या साठेबाजांवर केंद्राचा दणका; भावात मोठी घसरण, आता किलोचा नवा दर किती?

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात वाढलेल्या साखरेच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर ताण आला असताना केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. साखरेची साठेबाजी आणि कृत्रिम टंचाईला आळा घालण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या साखर साठवणुकीच्या मर्यादेत थेट ५० टक्क्यांनी कपात केली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात अतिरिक्त साखर उपलब्ध करून दिल्याने गेल्या काही दिवसांत वाढलेले साखरेचे दर आता घसरू लागले आहेत.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत व्यापाऱ्यांना एकावेळी जास्तीत जास्त २ हजार क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा ४ हजार क्विंटल होती. सणांच्या काळात मोठ्या प्रमाणावर साखर साठवून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा आणि त्यातून दर वाढवण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

साखरेच्या दरात मोठी घसरण
दरम्यान, केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यासाठी देशांतर्गत बाजारात १३ लाख टन अतिरिक्त साखर कोटा मंजूर केला आहे. त्यामुळे बाजारातील साखरेचा पुरवठा वाढला असून, नवी मुंबईतील घाऊक बाजारात साखरेचे दर आता प्रति किलो ४९ ते ५१ रुपये झाले आहेत. घाऊक बाजारातील दरात किलोमागे तब्बल ९ ते ११ रुपयांची घट झाली आहे.


सध्या किरकोळ बाजारात साखर ६५ ते ७० रुपये किलो दराने विकली जात आहे. मात्र, घाऊक बाजारातील दरातील घसरण कायम राहिल्यास आगामी काळात किरकोळ बाजारातही साखरेचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
‘द बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन’चे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात साखरेच्या दरात जवळपास ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र, केंद्र सरकारच्या उपाययोजनांनंतर साखर कारखान्यांकडून आकारल्या जाणाऱ्या दरातही जवळपास २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
त्यामुळे ऐन सणासुदीत वाढलेल्या साखरेच्या दरातून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.