‘ऑपरेशन टायगर’ने ठाकरे गटात खळबळ! नवरात्रीपूर्वी १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ३ मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; ६ जणांना मंत्रिपदाची चर्चा


मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातील तब्बल १४ आमदार नवरात्रीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील संभाव्य फूट आणि ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

शिंदे गटातील नेत्याच्या दाव्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे सध्या २० आमदार आहेत. त्यापैकी १४ आमदारांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे या मोहिमेची जबाबदारी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या संभाव्य पक्षांतरामागे केवळ राजकीय समीकरणेच नाहीत, तर सत्तेतील पदांचीही चर्चा असल्याचे समोर आले आहे. १४ आमदारांपैकी सहा जणांना सरकारमध्ये महत्त्वाची खाती किंवा मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. काहींना महामंडळांचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रीपद देण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

ठाकरे गटासाठी ही चर्चा विशेष महत्त्वाची ठरत आहे. कारण याआधीच ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात गेल्याचा दावा करण्यात आला होता. हा धक्का ताजा असतानाच आता थेट विधानसभा आमदारांच्या मोठ्या गटाच्या संभाव्य पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे २० आमदार विजयी झाले होते. यामध्ये आदित्य ठाकरे, सुनील राऊत, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, महेश सावंत, भास्कर जाधव यांच्यासह मुंबई, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या २० आमदारांपैकी नेमके कोणते १४ आमदार शिंदेंच्या गोटात जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. त्यानंतर राज्याच्या सत्तासमीकरणात आमूलाग्र बदल झाला. आता पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आमदार पक्ष बदलणार असल्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे.

मात्र, १४ आमदारांच्या संभाव्य प्रवेशाबाबत अद्याप ठाकरे किंवा शिंदे गटाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे हा दावा प्रत्यक्षात किती खरा ठरतो, कोणते आमदार पक्ष बदलतात आणि नवरात्रीपूर्वी खरंच राजकीय ‘धमाका’ होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!