महाराष्ट्रातील 2 कोटी, दिल्लीतील 47 लाख मतदारांची नावं यादीत नाहीत; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? लगेच करा चेक


मुंबई : महाराष्ट्र आणि दिल्लीत आज, 31 ऑगस्ट रोजी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अंतर्गत प्रारुप मतदार यादी म्हणजेच ड्राफ्ट वोटर रोल जाहीर करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन केलेली पडताळणी, फॉर्म जमा न होणे, डिजिटायझेशनची प्रक्रिया तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे मोठ्या संख्येने मतदारांची नावे या प्रारुप यादीत दिसत नसल्याचे समोर आले आहे.

गैरहजर, स्थलांतरित, मृत, डुप्लिकेट तसेच विदेशी नागरिक आणि इतर श्रेणीतील मतदारांची नावे पडताळणीनंतर प्रारुप यादीतून वगळण्यात आली आहेत.

दिल्लीत 47 लाखांहून अधिक नावे प्रारुप यादीत नाहीत

दिल्लीत एकूण 1 कोटी 45 लाख नोंदणीकृत मतदारांपैकी तब्बल 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत नसल्याचे समोर आले आहे. यापैकी सुमारे 97 लाख 53 हजार 507 मतदारांचा रेकॉर्ड डिजिटाईज करण्यात आला आहे.

तर महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी 7 लाख मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित मतदारांकडून आवश्यक फॉर्म जमा न झाल्याने त्यांचा रेकॉर्ड डिजिटाईज झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

नाव यादीत नसेल तर काय कराल?

प्रारुप मतदार यादीत नाव नसल्याने घाबरण्याची गरज नाही. याचा अर्थ तुमचा मतदानाचा अधिकार कायमस्वरूपी रद्द झाला आहे, असा होत नाही.

प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर 31 ऑगस्टपासून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मतदारांना आपला दावा किंवा हरकत दाखल करता येणार आहे. प्राप्त दावे आणि हरकतींच्या निपटाऱ्याची प्रक्रिया 29 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

सर्वप्रथम नाव चेक करा

तुमचं नाव प्रारुप मतदार यादीत आहे की नाही, हे सर्वप्रथम तपासा. त्यासाठी महाराष्ट्र किंवा दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ड्राफ्ट मतदार यादीमध्ये आपले नाव शोधता येईल.

नाव यादीत नसेल तर संबंधित प्रक्रियेनुसार दावा किंवा हरकत दाखल करता येईल.

नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म 6

जर पात्र मतदाराचे नाव प्रारुप मतदार यादीत नसेल, तर फॉर्म 6 भरून आवश्यक कागदपत्रांसह दावा सादर करता येईल. ही प्रक्रिया 30 सप्टेंबर 2026 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.

चुकीच्या नावावर हरकत घेण्यासाठी फॉर्म 7

जर एखाद्या अपात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत असल्याचे आढळले, तर त्यावर हरकत घेण्यासाठी फॉर्म 7 वापरता येतो.

मतदार यादीतील दुरुस्तीसाठी फॉर्म 8

मतदार ओळखपत्रातील माहितीमध्ये दुरुस्ती करायची असल्यास फॉर्म 8 वापरता येतो. नावातील स्पेलिंगची चूक, पत्त्यातील बदल किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी हा फॉर्म उपयोगी ठरतो.

त्यामुळे प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी घाबरून न जाता आधी आपले नाव तपासावे आणि आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी. 30 सप्टेंबर 2026 ही दावा-हरकतीसाठीची अंतिम मुदत असून 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!