एका घोटाने सगळं संपलं! गर्भवती प्रेयसीला कोल्ड्रिंक्स मधून ‘मृत्यूचा डोस’; प्रियकराचा भयंकर डाव उघड

मुंबई : नेहमीप्रमाणे समोरून आलेलं शीतपेय… पण ते प्यायल्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती अचानक बिघडली. उलट्या, चक्कर आणि वाढत जाणारा त्रास पाहून कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सुरुवातीला हा अचानक घडलेला प्रकार वाटत असतानाच, मृत्यूपूर्वी महिलेने कुटुंबीयांना सांगितलेल्या एका गोष्टीने संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. हे शीतपेय तिचा प्रियकर आशिष मगर याने दिल्याचं तिने सांगितल्याची माहिती आहे.
मृत महिला दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती होती. तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने आरोपी आणि तिच्यामध्ये वाद होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. २५ ऑगस्ट रोजी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. काही वेळाने वाद शांत झाल्यानंतर आशिषने तिला शीतपेय दिलं. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार या शीतपेयात डांबराच्या गोळ्या मिसळण्यात आल्या होत्या.

महिलेने शीतपेय प्यायल्यानंतर काही वेळातच तिला त्रास सुरू झाला. तिला उलट्या होऊ लागल्या. प्रकृती खालावत असताना तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. सुरुवातीला कुटुंबीयांना नेमका प्रकार लक्षात आला नाही. मात्र, परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.


या घटनेनंतर महिलेने दिलेल्या माहितीकडे कुटुंबीयांचं लक्ष गेलं. आशिषनेच आपल्याला शीतपेय दिलं आणि ते प्यायल्यानंतर आपली प्रकृती बिघडल्याचं तिने सांगितल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर आरसीएफ पोलिसांनी तपासाची दिशा बदलत आशिषची चौकशी सुरू केली.
चौकशीदरम्यान आरोपीने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचा दावा आहे. डॉक्टरांनीही महिलेचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल या तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत.
या प्रकरणात आरोपीने हा प्रकार अचानक केला की आधीच त्याचा कट रचला होता, शीतपेयात नेमका कोणता पदार्थ मिसळण्यात आला आणि महिलेच्या मृत्यूमागे चारित्र्यावरील संशयाव्यतिरिक्त आणखी काही कारण होतं का, याचा तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, आशिष मगर याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गर्भवती प्रेयसीच्या संशयास्पद मृत्यूमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, पोलीस तपासातून या संपूर्ण घटनेमागचं सत्य आता समोर येणार आहे.