जरांगेंच्या उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांची ‘दहावी कलमांची’ नोटीस! रस्ते, पार्किंगपासून प्रक्षोभक भाषणांपर्यंत कडक नियम; जरांगेंनीही दिलं लेखी उत्तर


जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या आज दुसऱ्या दिवशी आंदोलनस्थळी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेबाबत कडक पावले उचलली आहेत. गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गणेश गुरले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६८ अंतर्गत जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे.

या नोटिशीत आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी एकूण १० महत्त्वाच्या अटी आणि सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनामुळे महामार्ग किंवा इतर रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग पोलिसांनी निश्चित केलेल्या ठिकाणीच करावी लागणार आहे. तसेच वाहतूक आणि पार्किंग नियंत्रणासाठी स्वयंसेवक व समन्वयक नियुक्त करून त्यांच्या नावांची यादी पोलिसांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आंदोलनादरम्यान ध्वनीप्रदूषणासंदर्भातील कायदे आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी लागू होणाऱ्या जमावबंदीच्या आदेशांचे तसेच शस्त्रबंदीच्या आदेशांचे पालन करण्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सामाजिक सलोखा बिघडेल किंवा कोणत्याही जाती, धर्म अथवा समाजाच्या भावना दुखावतील, अशी वक्तव्ये किंवा कृती करू नयेत, अशी सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर चिथावणीखोर किंवा प्रक्षोभक भाषण करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असेही बजावण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांचे पालन करण्याचे निर्देशही नोटिशीत आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने आंदोलनस्थळी वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ज्वलनशील पदार्थांचा वापर टाळावा आणि आंदोलनस्थळी कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

दरम्यान, पोलिसांची नोटीस स्वीकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्याच नोटिशीवर आपले लेखी उत्तर नोंदवले आहे. अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषण गेल्या तीन वर्षांपासून लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जरांगे यांनी आपल्या उत्तरातून सरकारवरही गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनावर यापूर्वी सरकारकडूनच कायद्याचे उल्लंघन करून पोलिसांच्या बळाचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आंदोलकांवर अन्यायकारक आणि अमानुष प्रकार घडल्याचा दावाही त्यांनी केला. भविष्यात आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यासाठी सरकार जबाबदार असेल, असा इशाराही जरांगे यांनी लेखी उत्तरातून दिला आहे.

त्यामुळे अंतरवाली सराटीतील उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांची कडक नोटीस आणि त्यावर जरांगेंचे आक्रमक लेखी उत्तर यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!