गणेशोत्सवाआधी साखर-गुळाच्या दरांचा ‘गोडवा’ वाढला! किलोमागे साखर ₹१५ तर गूळ ₹८ स्वस्त; आयातीनंतर बाजारात मोठा बदल, सप्टेंबरपासून १५ दिवसांचा नवा कोटा!

मुंबई : महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी सणासुदीआधी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या साखर आणि गुळाच्या दरांना आता ब्रेक लागला आहे. केंद्र सरकारने परदेशातून तयार साखर आयात करण्यास परवानगी दिल्यानंतर घाऊक बाजारातील उपलब्धता वाढू लागली असून, गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात किलोमागे सुमारे १५ रुपयांची, तर गुळाच्या दरात ७ ते ८ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
जूनपासून सुरू असलेल्या दरवाढीला अखेर लगाम

गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या किमती सातत्याने वाढत होत्या. श्रावणातील सण-उत्सव, घरगुती वापर तसेच प्रक्रिया उद्योगांकडून वाढलेली मागणी यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला होता. त्यातच गेल्या हंगामातील साखरेचे कमी उत्पादन आणि पावसाला झालेला विलंब यामुळे नवीन हंगामातील उत्पादन उशिरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची भीती वाढली आणि जूनपासून दर चढत गेले. याचा परिणाम गुळाच्या बाजारावरही झाला.


मात्र, सरकारच्या आयातीच्या निर्णयानंतर बाजारात साखरेचा पुरवठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाढत्या दरांना काही प्रमाणात आळा बसला असून, आगामी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीत वाढणाऱ्या मागणीच्या काळात ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरू शकते.
सप्टेंबरपासून साखरेचा ‘नवा खेळ’; १५ दिवसांचा कोटा
दरम्यान, साखरेची साठेबाजी आणि अतिरिक्त खरेदी रोखण्यासाठी सरकारकडून सप्टेंबरपासून नवीन १५ दिवसांची कोटा पद्धत लागू करण्याची तयारी आहे. सध्याच्या मासिक कोट्याऐवजी साखर कारखान्यांना निश्चित केलेल्या कोट्यानुसार टप्प्याटप्प्याने विक्री करावी लागणार आहे.
या नियमानुसार निश्चित कोट्यापैकी ४० टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकावी लागेल, तर उर्वरित साखर पुढील आठवड्यात बाजारात आणावी लागणार आहे. गरज भासल्यास सरकार अतिरिक्त कोटाही जारी करू शकते. त्यामुळे सणासुदीच्या काळात बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास आणि दर नियंत्रणात ठेवण्यास मदत होण्याची शक्यता आहे.