खारघरमध्ये निवडणूक आयोगाच्या SIR फॉर्मवरून खळबळ! झेरॉक्स सेंटरमध्ये ३४०० गोपनीय फॉर्मांचा ‘साठा’ उघड; भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा अन् ५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

नवी मुंबई : निवडणूक आयोगाच्या गोपनीय कागदपत्रांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. सेक्टर १९ मधील एका झेरॉक्स सेंटरमध्ये SIR फॉर्मच्या अनधिकृत प्रती काढल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली. तपासणीदरम्यान तब्बल ३४०० गोपनीय SIR फॉर्म जप्त करण्यात आल्याने निवडणूक यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भाजपचे स्थानिक पदाधिकारी सूरज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार आहे.
२७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३०च्या सुमारास हा प्रकार समोर आला. ठाकरे सेनेचे नेते प्रसाद भोईर यांनी या कथित गैरप्रकाराची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित झेरॉक्स सेंटर गाठले. पाहणीदरम्यान सूरज पाटील हे SIR फॉर्मच्या प्रती काढताना आढळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ३४०० SIR फॉर्म जप्त करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हे फॉर्म तब्बल ११ वेगवेगळ्या मतदान केंद्रांशी संबंधित आहेत. यापैकी पाच मतदान केंद्रांचे प्रत्येकी १०० पेक्षा अधिक फॉर्म सापडले, तर अन्य सहा मतदान केंद्रांचे प्रत्येकी एक फॉर्म आढळले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाची गोपनीय माहिती बाहेरील व्यक्तीपर्यंत पोहोचली कशी, याचा शोध घेणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.


या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार FIR दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फॉर्म नेमके कुठून मिळाले, ते कोणाच्या माध्यमातून बाहेर गेले आणि त्यांची अनधिकृतपणे झेरॉक्स काढण्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे.
दरम्यान, या गोपनीय फॉर्मच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केल्याचा ठपका असलेल्या पाच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्तांना संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पनवेल महापालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस तपास वेगाने सुरू आहे. ३४०० गोपनीय फॉर्मचा हा मोठा साठा नेमका कसा बाहेर गेला आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा तपासानंतर होणार आहे.