मित्रांसोबत पानशेतला फिरायला आला, कालव्यात उतरला अन् काही क्षणांतच अनर्थ; सांगलीच्या तरुणाचा दुर्दैवी अंत


पुणे : मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पानशेत परिसरात आलेल्या 28 वर्षीय तरुणाचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तरुण काही क्षणांतच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील अमित दीपक चव्हाण (वय 28) हा आपल्या मित्रांसोबत पानशेत परिसरात फिरण्यासाठी आला होता. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास पाण्याचा आनंद घेत असताना अमित कालव्याच्या पाण्यात उतरला. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

मित्राने 112 वर फोन केला

अमित पाण्यात वाहून जात असल्याचं पाहून त्याच्या मित्राने तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

रात्री उशिरा मृतदेह सापडला

बचाव पथकातील तानाजी भोसले आणि गणेश सपकाळ यांनी रात्रीच्या अंधारातही शोधमोहीम सुरू ठेवली. अथक प्रयत्नांनंतर रात्री उशिरा अमितचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पर्यटकांना पोलिसांचं आवाहन

पावसाळ्यात धरणं, कालवे, नदी आणि धबधब्यांच्या परिसरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये, तसेच अनोळखी आणि धोकादायक ठिकाणी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!