शरद पवारांच्या बैठकीला रोहित पवार गैरहजर; काँग्रेसशी जवळीक वाढली, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अन् आता राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असताना आमदार रोहित पवार यांच्या एका निर्णयाने नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. मुंबईत शनिवारी पक्षाची महत्त्वाची कोअर कमिटीची बैठक पार पडली; मात्र रोहित पवार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी आमदार अशोक पवार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख आणि खासदार निलेश लंके यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी राजकीय रणनीती, पक्षाची संघटनात्मक दिशा आणि राज्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. अशा महत्त्वाच्या बैठकीत रोहित पवार गैरहजर राहिल्याने त्यांच्या अनुपस्थितीमागे नेमकं कारण काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार राज्यभर दौरे करत असून आंदोलनं आणि विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांची वाढलेली जवळीकही राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे कोअर कमिटीच्या बैठकीपासून त्यांचं दूर राहणं या सर्व घडामोडींशी जोडून पाहिलं जात आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनाही पुन्हा वेग आला आहे. भाजपसोबत हातमिळवणी करून एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या भूमिकेला रोहित पवारांचा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षाच्या भविष्यातील राजकीय निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. अशा परिस्थितीत त्यांची कोअर कमिटीच्या बैठकीतील अनुपस्थिती अधिकच लक्षवेधी ठरली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित पवारांनी बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिली होती. मात्र, त्यांच्या गैरहजेरीचं नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही. त्यामुळे ही अनुपस्थिती केवळ नियोजित कारणामुळे होती की त्यामागे काही राजकीय संकेत आहेत, यावरून चर्चांना उधाण आलं आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीत नाशिक कुंभमेळ्याच्या नावाखालील कथित बोगस भरती रॅकेट, शासकीय भरतीतील पेपरफुटी आणि विविध गैरव्यवहारांसह राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पक्षाच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या बैठकीत रोहित पवार नसल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना आणखी बळ मिळालं आहे.
रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहून स्वतंत्र भूमिका घेणार का, काँग्रेसशी राजकीय जवळीक वाढवणार का किंवा भविष्यात एखाद्या नव्या राजकीय समीकरणाचा भाग होणार, याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र, पक्ष सोडण्याबाबत किंवा काँग्रेसमध्ये जाण्याबाबत रोहित पवारांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या राजकीय तर्कवितर्कांच्या पातळीवरच आहेत. मात्र, कोअर कमिटीच्या बैठकीतील गैरहजेरी आणि त्यांच्या अलीकडच्या राजकीय हालचालींमुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवं समीकरण आकार घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.