मुंबई कुणाची? शरद पवारांचं मोठं विधान; एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील ससून डॉक मच्छीमार बंदराची पाहणी केली. यावेळी स्थानिक मच्छीमारांनी बंदरातील रखडलेली कामं आणि विविध समस्यांचा पाढा पवारांसमोर वाचला. ससून डॉक मच्छीमार बंदर बचाव कृती समितीच्या वतीने पवारांचा सत्कारही करण्यात आला.
रखडलेल्या कामांमुळे मच्छीमार त्रस्त
ससून डॉक बंदरातील अनेक कामं अर्धवट अवस्थेत असून, त्याचा मोठा फटका स्थानिक मच्छीमारांना बसत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. कामं पूर्ण न करताच मच्छीमारांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री नितेश राणे यांच्याबाबतही मच्छीमारांनी शरद पवारांकडे आपल्या तक्रारी मांडल्या.


‘मुंबई कुणाची?’ पवार म्हणाले…
मच्छीमारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी मुंबईच्या इतिहासातील मासेमारी व्यवसायाच्या महत्त्वाचा उल्लेख केला. “मुंबई कुणाची?” हा प्रश्न अनेक वर्षांपासून उपस्थित केला जात असल्याचं सांगत, मुंबई ही मासेमारी करणाऱ्यांची असल्याचं पवार म्हणाले.
मासेमारीचा व्यवसाय अनेक भागांमध्ये विस्तारला असला तरी आजही हा व्यवसाय टिकून असल्याचं त्यांनी नमूद केलं.
आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची भेट घेणार
मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि संबंधित मत्स्य व्यवसाय मंत्र्यांची वेळ घेऊन मच्छीमारांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
“मंत्रालय अगदी जवळ असताना मच्छीमारांना मदत करण्यासाठी या प्रश्नांकडे लक्ष घालू,” असंही पवार म्हणाले.
दरम्यान, आपल्या मिश्किल शैलीत पवारांनी “माझा संबंध मासे खाण्याचा आहे” अशी टिप्पणीही केली. आता त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पुढील आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक होते का आणि ससून डॉकमधील रखडलेल्या कामांवर ठोस निर्णय घेतला जातो का, याकडे मच्छीमारांचं लक्ष लागलं आहे.