भुजबळांसमोर महाजनांची ‘ती’ एक ओळ अन् सभागृहात हशा! म्हणाले, ‘माझ्याकडे नका बघू… कामाकडे बघा’; फडणवीसांचंही कांद्यावर मिश्कील भाष्य

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या एका मिश्कील वक्तव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर महाजन यांनी केलेल्या टिप्पणीवर कार्यक्रमस्थळी हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळातही या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.
चाचडगाव येथे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात महाजन यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत आधुनिक शेतीच्या दृष्टीने कृषी महाविद्यालयाचे महत्त्व अधोरेखित केले.

मराठा विद्या प्रसारक संस्थेला शंभर वर्षांचा इतिहास असून या संस्थेने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली आहे, असे महाजन यांनी सांगितले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही संस्थेचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या काळात राजकीय मतभेद असले तरी निवडणूक संपल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असा संदेशही त्यांनी दिला.


यानंतर मुख्यमंत्र्यांकडून शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक ती मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना महाजन यांनी स्वतःच्या कामाचा उल्लेख केला. याचवेळी छगन भुजबळांकडे पाहत त्यांनी मिश्कीलपणे, “तुम्ही माझ्या कामाकडे बघा, माझ्याकडे बघू नका, बरं का भुजबळ साहेब,” असे म्हटले. महाजन यांच्या या वाक्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
आपल्या वक्तव्याचा पुढचा संदर्भ देताना महाजन यांनी आणखी एक मिश्कील टिप्पणी केली. “यानंतर भुजबळ साहेबांचे भाषण आहे की नाही, मला माहिती नाही; नाहीतर ते मला टोमणा मारतील,” असे ते म्हणाले. त्यामुळे कार्यक्रमातील वातावरण आणखी हलकेफुलके झाले. दोन्ही नेत्यांमधील या संवादाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
महाजन यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याचाही उल्लेख केला. हा केवळ प्रशासनाचा विषय नसून नाशिककरांसह सर्वांचा सहभाग असलेला सोहळा असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी आणि संबंधित घटकांनी योगदान देण्याचे आवाहन केले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. दोन लाखांहून अधिक विद्यार्थी आणि दोन हजारांहून अधिक शिक्षक असलेली ही संस्था नाशिकच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा असून द्राक्ष निर्यातीत जिल्ह्याचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस यांनी कांद्याच्या वाढलेल्या दरावरही मिश्कील भाष्य केले. “आज मला कांदे भेट दिले असते तर घरी नेले असते,” अशी टिप्पणी करत त्यांनी कांद्याच्या दरवाढीचा संदर्भ दिला. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांसमोरील उत्पादन खर्च, हमीभाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर यांसारख्या आव्हानांकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी मोठ्या मेहनतीने उत्पादन घेत असून त्याला योग्य मोबदला मिळण्यासाठी शेती क्षेत्रातील प्रश्नांवर सातत्याने काम करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.