स्कूटीवरून जात होत्या दोन महिला; पाठीमागून भरधाव कार आली अन् क्षणात घडलं भयंकर, बारामतीत दोघींचा दुर्दैवी अंत

बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात भरधाव कारने स्कूटीला दिलेल्या धडकेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (२७ ऑगस्ट) दुपारी सव्वा एकच्या सुमारास हिरकणी गोडाऊनसमोर हा अपघात झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीता प्रदीप लोंढे (वय ३८) आणि मनीषा बबन शिंदे (वय ४३) या दोन्ही महिला स्कूटीवरून जात होत्या. हिरकणी गोडाऊनजवळ त्या पोहोचल्या असताना मागून आलेल्या किया सोनेट कारने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. कारचा वेग अधिक असल्याने धडक इतकी तीव्र होती की दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या.

अपघातानंतर दोन्ही महिलांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतींमुळे संगीता लोंढे आणि मनीषा शिंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


या प्रकरणी प्रदीप बबन लोंढे (वय ४८, रा. पिंपरद, ता. फलटण, जि. सातारा) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कारचालक शुभम शिवाजी खामकर (रा. पाटस, तामखंडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.