गणेशोत्सवाच्या डीजेवर मोठा ट्विस्ट! २ टॉप-२ बेसची मर्यादा सैल होणार? ४ टॉप-४ बेसला ८०% मंडळांचा कौल; ‘प्लाझ्मा-प्रेशर मीड’ला मात्र नो एंट्री

पुणे : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवातील डीजेच्या वापराबाबत पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला आता वेग आला आहे. सुरुवातीला डीजेसाठी दोन टॉप आणि दोन बेस वापरण्याची भूमिका पोलिस प्रशासनाने मांडली होती. मात्र, गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी चार टॉप आणि चार बेस वापरण्याचा पर्याय सुचवला असून, या प्रस्तावाला तब्बल ८० टक्के मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे डीजेच्या नियमांमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवातील कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनिप्रदूषण हा यंदाही महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. पोलिस प्रशासनाने सुरुवातीपासूनच अतितीव्र आवाजावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका घेतली असून, यासाठी गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेऊन चर्चा केली जात आहे. मात्र, उत्सवाचा उत्साह आणि ध्वनिप्रदूषण नियंत्रण यामध्ये समतोल साधण्यासाठी चार टॉप-चार बेसचा पर्याय विचाराधीन करण्यात आला आहे.

या प्रस्तावाला मोठ्या संख्येने मंडळांनी पाठिंबा दिल्याने पोलिस प्रशासनाची भूमिका काहीशी नरमली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, अतितीव्र आवाज करणाऱ्या उपकरणांबाबत पोलिसांची भूमिका अजूनही स्पष्ट आणि कठोर आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरणाऱ्या उपकरणांना परवानगी दिली जाणार नाही.


विशेषतः प्लाझ्मा आणि प्रेशर मीड यांसारख्या उपकरणांवरील बंदी कायम राहणार आहे. या उपकरणांमुळे आवाजाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयाला गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आता उर्वरित मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे चार टॉप आणि चार बेसला अधिकृत परवानगी मिळते का, की पोलिस प्रशासनाची दोन टॉप-दोन बेसचीच मर्यादा कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवापूर्वी डीजे आणि ध्वनियंत्रणांच्या वापराबाबत अंतिम नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.