अंतर्वस्त्रात लपवलेली चिठ्ठी अन् भाजप नेत्याच्या सुनेच्या मृत्यूचं गूढ उकललं! पतीच्या कथित प्रेमसंबंधांचा उल्लेख; सूरतमध्ये दोघांना अटक

सूरत : गुजरातमधील सूरतमध्ये भाजपच्या स्थानिक महिला नेत्या शशी सिंह यांच्या कुटुंबात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. त्यांची सून निधी सिंह यांनी पळसाणा-कडोदरा परिसरातील श्रीनिवास सोसायटीमधील राहत्या घरी आत्महत्या केली. सुरुवातीला या मृत्यूच्या कारणाबाबत संशय निर्माण झाल्याने कुटुंबीयांनी मृतदेहाचे पॅनेल पोस्टमार्टम करण्याची मागणी केली होती.
पोस्टमार्टमदरम्यान डॉक्टरांना निधी यांच्या अंतर्वस्त्रात लपवून ठेवलेली एक सुसाईड नोट आढळली. या चिठ्ठीमुळे तपासाला अचानक नवी दिशा मिळाली. चिठ्ठीत निधी यांनी पती सौरभकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाचा आणि त्याच्या दुसऱ्या युवतीसोबत असलेल्या कथित संबंधांचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.

चिठ्ठीतील माहिती समोर आल्यानंतर निधी यांच्या भावाने कडोदरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे निधी मानसिक तणावात होत्या आणि या परिस्थितीला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


तक्रारीनंतर पोलिसांनी सौरभ आणि इशिका बॅनर्जी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी सुसाईड नोटसह उपलब्ध कागदपत्रे, तांत्रिक माहिती आणि इतर प्राथमिक पुराव्यांची पडताळणी केली. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. निधी यांच्या मृत्यूमागे नेमकी कोणती परिस्थिती होती, कथित संबंधांमुळे त्यांच्यावर मानसिक दबाव होता का आणि सुसाईड नोटमधील आरोपांना पुष्टी देणारे आणखी पुरावे मिळतात का, याचा तपास केला जात आहे.
एका चिठ्ठीमुळे संशयास्पद वाटणाऱ्या मृत्यूच्या तपासाला वेगळे वळण मिळाले असून, आता पोलिसांच्या पुढील तपासातून या संपूर्ण प्रकरणामागचे वास्तव समोर येण्याची शक्यता आहे.