अहिल्यानगरमध्ये खळबळ! भाजपच्या बड्या नेत्यावर जमावाचा हल्ला; कारचीही तोडफोड

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषी शेटे यांच्यावर जमावाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
यावेळी त्यांच्या कारचीही तोडफोड करण्यात आली. हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा शहरातील ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी ऋषी शेटे यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या पथकाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. या कारवाईला काही फेरीवाल्यांनी विरोध केला.


दरम्यान, कारवाई सुरू असताना ऋषी शेटे यांची कार पथकाच्या मागून जात होती. त्यामुळे काही जणांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि परिस्थिती अचानक चिघळली. संतप्त जमावाने त्यांच्या कारची तोडफोड केली. त्यानंतर शेटे यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.
काही जणांनी त्यांच्या हातावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे ऋषी शेटे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.
90 ते 100 जणांवर गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी पोलिसांनी रात्री सुमारे 90 ते 100 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान नगरपंचायतीचे अधिकारी आणि पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेमुळे नेवासा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. घटनेतील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.