लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! सिया गोयलला तुरुंगात खास वागणूक? केतनच्या कुटुंबीयांनी थेट कारागृह प्रशासनावरच उठवली बोटं

पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात आता आणखी एक खळबळजनक आरोप समोर आला आहे. लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालला कड्यावरून ढकलून दिल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या सिया गोयलला येरवडा महिला कारागृहात कथितपणे व्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्याचा दावा केतनच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी केला आहे. या आरोपांमुळे कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सिया गोयलला इतर कैद्यांच्या तुलनेत विशेष सुविधा आणि वेगळी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे तुरुंगातील नियमांचा भंग होत आहे का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. “ही लढाई फक्त केतनसाठी नाही, तर गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक कायम राहावा यासाठी आहे,” अशी भूमिका कुटुंबीयांनी मांडली आहे.

दरम्यान, सिया गोयलला कथित व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सर्वप्रथम ‘गुलाबो गँग’ आणि ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’कडून करण्यात आला. संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली या संघटनांनी पुण्यातील मार्केट यार्ड परिसर आणि सिया गोयलच्या घरासमोर दोन दिवस आंदोलन केल्याची माहिती आहे. तुरुंगात आरोपींना मिळणाऱ्या कथित सवलती तात्काळ बंद कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीसह काही स्थानिक राजकीय गटांनीही या मागणीला पाठिंबा देत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.


या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी १८ जून रोजी घडलेलं लोहगड किल्ल्यावरील हत्याकांड आहे. केतन अग्रवालला कड्यावरून ढकलून दिल्याचा आरोप सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आहे. दोघांनी केतनला मारल्याची कबुली दिल्याचं तपासात समोर आल्याचं वृत्त आहे. सध्या सिया आणि चेतन हे दोघेही येरवडा कारागृहात आहेत. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यास मंजुरी दिल्याची माहितीही समोर आली आहे.
तपासादरम्यान दोन्ही आरोपींची पॉलीग्राफ म्हणजेच लाय डिटेक्टर चाचणी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न झाला होता. मात्र, सिया आणि चेतन यांनी या चाचणीला नकार दिला. त्यानंतर मॅजिस्ट्रेट न्यायालयानेही पोलिसांचा पॉलीग्राफ चाचणीचा अर्ज फेटाळला. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडून आता डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांवर तपासाचा भर देण्यात येत आहे. पोलिसांकडे ४,४०० हून अधिक कॉल डिटेल्स, डिजिटल फुटप्रिंट्स आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याची माहिती आहे.
एकीकडे हत्याकांडाचा तपास तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढे जात असताना दुसरीकडे सिया गोयलला तुरुंगात कथित विशेष वागणूक मिळत असल्याच्या आरोपांनी नवा वाद निर्माण झाला आहे. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे येरवडा कारागृह प्रशासनाच्या चौकशीत नेमकं काय समोर येतं आणि कुटुंबीयांच्या आरोपांवर प्रशासन काय उत्तर देतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.