ईदच्या मिरवणुकीत अचानक तणाव! मध्यरात्री मोठा गोंधळ! ६० बाईकस्वारांचा जमाव, घोषणाबाजी अन् पोलिसांनाही मारहाण; ३ जणांवर गुन्हा

मुंबई : ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री लालबाग-परळ परिसरात अचानक तणाव निर्माण झाला. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत होती. याच कारवाईदरम्यान वादाची ठिणगी पडली आणि काही वेळातच दोन गट आमनेसामने आल्याने परिस्थिती चिघळली.
पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११.४५ वाजता डॉ. बी. ए. रोडवरील सेंट्रल रेल्वेच्या परळ वर्कशॉपसमोर नाकाबंदी करण्यात आली होती. मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे आणि बदललेल्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कारवाई सुरू होती. कारवाईनंतर सुमारे ५० ते ६० दुचाकीस्वार काही अंतर पुढे गेले आणि त्यांनी रस्त्यावरच वाहने थांबवली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. याचवेळी घोषणाबाजी सुरू झाल्याने वातावरण अधिक तापले.

घटनेची माहिती परिसरात पसरताच लक्ष्मी कॉटेज भागातील सुमारे ३० ते ४० तरुणही रस्त्यावर जमा झाले. दोन्ही गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. मात्र, काही वेळातच हा वाद झटापटीपर्यंत पोहोचला. दोन्ही बाजूंकडून झेंड्यांच्या काठ्यांचा वापर करून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.


परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. दोन्ही गटांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत असताना काही पोलीस कर्मचारीही झटापटीत जखमी झाल्याची माहिती आहे. वाढता जमाव पाहता पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवले. रात्री सुमारे १२.२० वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.
या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी रेहान मसूद सय्यद (१९), आदिल खान अहमद खान (१९) आणि मिराज मोहम्मद फिरोज रईस (१८) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह जमावातील इतर अज्ञात व्यक्तींविरोधातही तपास सुरू आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १८९(१), १८९(२), १८९(३), १९१(१), १९१(२), १९५(१), ११८(१), १२१(१) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १३७ आणि १३३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. घटनेनंतर लालबाग-परळ परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. पुढील तपासात झटापटीमागील नेमके कारण, सहभागी व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांना झालेल्या दुखापतीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.