सदावर्तेंना धक्का! भाजपने एसटी कामगारांसाठी उभारली नवी संघटना; विजय मालोकारांकडे अध्यक्षपद, अकोल्यातून मोठी घोषणा


अकोला : महाराष्ट्राच्या एसटी महामंडळातील कामगारांच्या प्रश्नांवर भाजपने आता थेट संघटनात्मक एन्ट्री केली आहे. अकोल्यात भाजपप्रणित ‘एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य’ या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली असून विजय मालोकार यांची संस्थापक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांची संघटना कार्यरत असतानाच भाजपने स्वतंत्र संघटना उभारल्याने या निर्णयाची राजकीय आणि कामगार वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अकोल्यात या नव्या संघटनेची पहिली बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर आणि आमदार वसंत खंडेलवाल उपस्थित होते. नव्याने स्थापन झालेली संघटना श्रम भारतीय जनता कामगार महासंघाशी संलग्न असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपशी संबंधित संघटना आता स्वतंत्रपणे भूमिका मांडणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न शासनदरबारी मांडणे, त्यांच्या सेवा-सुविधांशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि एसटी महामंडळाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी काम करणे, हा नव्या संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. कामगारांच्या प्रश्नांना संघटित स्वरूपात आवाज देऊन त्यावर शासनाकडून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका संस्थापक अध्यक्ष विजय मालोकार यांनी मांडली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पार्श्वभूमी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यावेळी ‘सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ’ ही संघटना स्थापन करण्यात आली होती. या संघटनेचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर, तर कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत आहेत.

दरम्यान, एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालीही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले होते. सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचे नाव ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यात आधीपासूनच विविध संघटना सक्रिय असताना भाजपने आता आणखी एक स्वतंत्र संघटना उभी केली आहे.

भाजपच्या या निर्णयामुळे एसटी कामगार संघटनांच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सदावर्ते यांच्या संघटनेला भाजपशी जवळीक असलेली संघटना म्हणून पाहिले जात होते. मात्र, आता भाजपने स्वतःची स्वतंत्र संघटना स्थापन केल्याने सदावर्ते यांच्या संघटनेपासून भाजपने अंतर घेतले का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भाजपकडून नव्या संघटनेचा भर कामगारांचे प्रश्न आणि एसटी महामंडळाच्या हितावर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आता विजय मालोकार यांच्या नेतृत्वाखालील ही संघटना राज्यभर किती विस्तारते आणि एसटी कर्मचाऱ्यांचा तिला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या संघटनेमुळे एसटी कामगारांच्या प्रश्नांवर राजकीय हस्तक्षेप वाढणार की कामगारांच्या मागण्यांना अधिक संघटित आवाज मिळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!