‘लव्हस्टोरी’चा MPSC भरतीला फटका! प्रेमाच्या चर्चेतून पेपरफुटीचा ट्विस्ट, 488 उमेदवारांचं भवितव्य पुन्हा परीक्षेच्या उंबरठ्यावर!


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या भरतीला पेपरफुटीच्या प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी केली. या तपासात एका उमेदवाराला प्रश्नसंच आधीच मिळाल्याचे आणि त्याचा फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. त्यामुळे MPSCने संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रकरणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे पेपरफुटीमागे कथित प्रेमप्रकरण असल्याची माहिती. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, एका प्रियकराने आयोगातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी संपर्क साधून प्रश्नसंच मिळवल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे प्रश्नसंच मोठ्या संख्येने उमेदवारांपर्यंत पोहोचला नसून, एका उमेदवारालाच त्याचा लाभ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या कथित ‘लव्हस्टोरी’मागील संपूर्ण घटनाक्रम अद्याप तपासाधीन आहे.

या गैरप्रकाराचा लाभ एका उमेदवाराला झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असला, तरी त्याची किंमत आता संपूर्ण उमेदवारांना मोजावी लागणार आहे. चाळणी परीक्षेनंतर 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्या होत्या. 1 जुलै ते 22 जुलैदरम्यान मुलाखती घेण्यात आल्या आणि 22 जुलै रोजी 485 पात्र व 3 अपात्र उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती.

मात्र पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर आयोगाने या सर्व प्रक्रियेवर पाणी फेरले आहे. आता औषध निरीक्षक पदासाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तसेच फेरपरीक्षेसाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवीन तारीख आयोगाकडून स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे.

ही चाळणी परीक्षा 22 मार्च रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवरील परीक्षा केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने झाली होती. 12 जून रोजी निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण होऊन गुणवत्ता यादीही जाहीर झाली होती. त्यामुळे भरती जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच पेपरफुटीच्या प्रकरणाने संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला.

दरम्यान, एका कथित प्रेमसंबंधातून प्रश्नसंच बाहेर पडल्याच्या चर्चेने MPSCच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रश्नसंच नेमका कसा बाहेर आला, संबंधित कर्मचाऱ्याची भूमिका काय होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. या तपासातून पुढे येणाऱ्या माहितीकडे आता हजारो MPSC उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!