पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी बहुतांश भागांत पाणीपुरवठा बंद, शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार (27 ऑगस्ट) रोजी शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (28 ऑगस्ट) सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी 27 ऑगस्टपूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

‘या’ भागांचा पाणीपुरवठा बंद
पर्वती एचएलआर टाकी परिसरातील सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, कोंढवा खुर्द, अप्पर व लोअर इंदिरानगर, गंगाधाम आणि महर्षीनगरसह पर्वती गावठाण परिसर प्रभावित होणार आहे.


भामा आसखेड जलकेंद्रांतर्गत लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, येरवडा आणि खराडी परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
एसएनडीटी एचएलआर परिसरातील औंध, बोपोडी, गोखलेनगर, पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रोड, प्रभात रोड, पौड रोड, कर्वे रोड आणि वारजे परिसरालाही याचा फटका बसणार आहे.
चांदणी चौक टाकीअंतर्गत बावधन, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी आणि सुस रोड परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
याशिवाय गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, वारजे, चतुःश्रृंगी, होळकर, कोंढवे-धावडे तसेच वडगाव-राजीव गांधी पंपिंग परिसरातील विविध भागांमध्येही पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
डोंगर चढून तळ्याला दिली नवसंजीवनी
दरम्यान, मसूर-हणबरवाडी-निगडीच्या सीमेवरील सुमारे 600 मीटर उंच थोरल्या डोंगरावर जलसंधारणाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, युवक आणि बालचमुंनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या मृत तळ्याची साफसफाई केली.
कडक उन्हाची पर्वा न करता डोंगर चढून करण्यात आलेल्या या श्रमदानातून तळ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. आता पावसाळ्यात या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून तळ्यात पाणी साचले आहे.