विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी! तुळशी अर्चन पूजेसाठी ऑनलाईन नोंदी सुरू; कुठे आणि कशी कराल बुकिंग? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी श्री पांडुरंगाची ‘तुळशी अर्चन पूजा’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या पूजेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही पूजा करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे.

पूजेसाठी किती शुल्क?
‘तुळशी अर्चन पूजा’साठी मंदिर समितीने 2,500 रुपये देणगी मूल्य निश्चित केले आहे. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सण-उत्सव तसेच गर्दीचे दिवस वगळून भाविकांना ही पूजा उपलब्ध करून दिली जाणार आहे.


भाविक मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
ऑनलाइन नोंदणी करताना अडचण आल्यास काय कराल?
ऑनलाइन नोंदणी करताना तांत्रिक अडचण आल्यास नित्योपचार कार्यालयातून भाविकांना आवश्यक मार्गदर्शन आणि नोंदणीसाठी मदत केली जाणार आहे. पूजेशी संबंधित अटी, नियम आणि इतर माहिती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी भाविकांनी मंदिर समितीच्या 02186-299299 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावस्त्रांमधून मंदिर समितीला 20 लाखांचे उत्पन्न
दरम्यान, श्री विठ्ठल-रुक्मिणी माता आणि परिवार देवतांच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेली महावस्त्रे प्रसादाच्या स्वरूपात भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आतापर्यंत हजारो भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून, त्यातून मंदिर समितीला सुमारे 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण घम यांनी दिली.