राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! अहिल्यानगर, सांगली, नाशिक, नागपूरसाठी ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, शिक्षण, क्रीडा, महसूल आणि न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याचा निर्णय सर्वाधिक चर्चेत राहिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज 6 लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांना 5 हजार 86 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. आतापर्यंत या योजनेतून 12.56 लाख शेतकऱ्यांना 10 हजार 115 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

अहिल्यानगरमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटील आरोग्य विज्ञान विद्यापीठ
मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग या शाखांमधील पदवी, पदव्युत्तर तसेच सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत.


नागपुरात लता मंगेशकर विद्यापीठ
नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी संबंधित या निर्णयामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे.
जत नगरपरिषदेला शासकीय जमीन
सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी मौजे जत येथील 2 हजार 585 चौरस मीटर शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
पिंपळगाव बसवंतमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली. यासाठी आवश्यक पदे आणि त्यासंबंधीच्या खर्चाच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू तसेच त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.