मोठी बातमी! शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जमा; 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी


मुंबई: महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात 6 लाख 36 हजार 36 पात्र शेतकऱ्यांना 5 हजार 86 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वितरणाचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 5 हजार 29 कोटी रुपये वितरित करून 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

दोन टप्प्यांत 12.58 लाख शेतकरी कर्जमुक्त

राज्य सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन टप्प्यांत एकूण 10 हजार 115 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या माध्यमातून 12 लाख 58 हजार 243 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. लाभार्थींची संख्या अद्ययावत होत असून, पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे नियोजन आहे. तसेच 23 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. एकूण 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

कर्जमाफीसाठी 40,980 कोटींचा खर्च अपेक्षित

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शेतकरी संघटनांच्या आंदोलनांनंतर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला. योजनेच्या निकषांमध्ये बदल करत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या योजनेसाठी सरकारवर सुमारे 40 हजार 980 कोटी रुपयांचा आर्थिक भार अपेक्षित आहे.

आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक आवश्यक

कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण तसेच अॅग्रीस्टॅकशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!