यवतच्या बाजारतळावर आकड्यांचा खेळ रंगला अन् पोलिसांचा छापा पडला! ‘कल्याण मटका’प्रकरणी दोघे जेरबंद; ७ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त

यवत : यवत बाजारतळ परिसरात सुरू असलेल्या कथित ‘कल्याण मटका’ जुगारावर यवत पोलिसांनी धडक कारवाई केली. चिठ्ठ्यांवर आकडे लिहून नागरिकांकडून पैसे घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला. या कारवाईत दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ७ हजार ५० रुपये रोख, आकडेमोडीच्या चिठ्ठ्यांचे बुक आणि बॉलपेन जप्त करण्यात आले.
यवत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला बाजारतळ परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पंचांसह पोलिसांनी नियोजन करून अतुल जाधव यांच्या घराजवळील आडोशात कारवाई केली. पोलिसांनी घटनास्थळी दोघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये कपिल नंदकुमार भागवत (वय २८, रा. आनंदग्राम सोसायटी, यवत; मूळ रा. कुरबावी, ता. माळशिरस) आणि प्रेम महादेव बनसोडे (वय २१, रा. आनंदग्राम सोसायटी, यवत; मूळ रा. बावडा, ता. इंदापूर) यांचा समावेश आहे. दोघांकडून रोख रक्कमेसह जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.


पोलिसांच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत दोघांनी यवत येथील निखिल भैरट याच्या सांगण्यावरून कल्याण मटका घेत असल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे निखिल भैरट याच्यासह तिघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे यवत बाजारतळ परिसरातील कथित अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जुगाराच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे उकळण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खोमणे करीत आहेत.