‘पेपर’ वाचवण्याची जबाबदारी असतानाच प्रश्नपत्रिकेचा फोटो! परभणीत नर्सिंग परीक्षेत धक्कादायक प्रकार; WhatsApp कनेक्शन उघड, ४ जण अटकेत


परभणी : परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून कडक नियम असतानाच परभणीत त्याच प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलमध्ये टिपून बाहेर पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या जीएनएम प्रथम वर्षाच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त असलेल्या महिलेवरच प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याचा आरोप असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

२० ऑगस्ट रोजी परभणी शहरातील इंदिरा गांधी एएनएम नर्सिंग स्कूलमध्ये जीएनएम प्रथम वर्षाची परीक्षा सुरू होती. सकाळी सुमारे १० वाजून २९ मिनिटांनी पर्यवेक्षक राखी चव्हाण यांनी मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिकेचे फोटो काढल्याचा आरोप आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल वापरण्यास मनाई असतानाही प्रश्नपत्रिकेची छायाचित्रे घेण्यात आली.

यानंतर या प्रकरणाला WhatsAppची जोड मिळाल्याचे तपासात समोर आले. राखी चव्हाण यांनी काढलेले प्रश्नपत्रिकेचे फोटो त्यांची बहीण राणी चव्हाण हिला WhatsAppवर पाठवल्याचा आरोप आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका परीक्षा कक्षाच्या बाहेर गेल्याचा संशय अधिक बळावला.

दरम्यान, केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांना प्रश्नपत्रिका बाहेर पाठवली जात असल्याचा संशय आला. त्यांनी संबंधित पर्यवेक्षिकेच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेची छायाचित्रे आढळल्याने संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर केंद्र निरीक्षकांनी पोलिसांना माहिती देत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून राखी चव्हाण, राणी चव्हाण, प्रतीक्षा किरण खिल्लारे, ईश्वर बाराबोईना आणि दिलीप बोरकर यांच्याविरोधात नानल पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रश्नपत्रिकेचे फोटो पुढे आणखी कोणाला पाठवण्यात आले होते का, त्यांचा गैरवापर झाला का आणि या कथित प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणातील तपासातून आणखी कोणती नावे समोर येतात आणि प्रश्नपत्रिकेचे फोटो नेमके कुठपर्यंत पोहोचले, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!