पिंपरी-चिंचवाडमध्ये मोकाट कुत्र्यांवर अखेर ‘मेगा अॅक्शन’! नसबंदी, रेबिज लसीकरण अन् मायक्रोचिप; ४ वाहने २४ तास रस्त्यावर, ३ वर्षांत तब्बल २ कोटींची तरतूद

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट आणि भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने आता व्यापक मोहीम हाती घेतली आहे. नागरिक, विशेषतः लहान मुलांना श्वानांच्या चाव्याच्या घटना वाढत असल्याने या प्रश्नावर महापालिका सभागृहातही नगरसेवकांकडून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी, रेबिज प्रतिबंधक लसीकरण, कायमस्वरूपी चिन्हांकन आणि जखमी श्वानांवरील उपचार अशा विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
या मोहिमेसाठी पुण्यातील कर्मा फाउंडेशन या प्राणी कल्याण क्षेत्रात कार्यरत संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही संस्था महापालिकेकडून कोणतेही मानधन न घेता काम करणार आहे. संस्थेकडे श्वान संतती नियमन केंद्र तसेच नेहरूनगर येथील पशुवैद्यकीय दवाखाना आणि ट्रॉमा केअर सेंटरचे कामकाज सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या खर्चात बचत होणार आहे.

मोकाट श्वान पकडल्यानंतर त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर रेबिज प्रतिबंधक लसीकरण करून त्यांच्या कानावर मायक्रोचिपद्वारे कायमस्वरूपी चिन्हांकन केले जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर श्वानांची आवश्यक देखभाल केली जाईल. नेहरूनगर येथील केंद्रात जखमी श्वानांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना खाद्य पुरवण्याची व्यवस्थाही संस्था करणार आहे.


या संपूर्ण कामासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, पॅरा पशुवैद्यकीय कर्मचारी, प्राणी हाताळणारे कर्मचारी आणि सहाय्यक मनुष्यबळ संस्था स्वतःच्या खर्चाने नेमणार आहे. औषधे, लसी, शस्त्रक्रिया साहित्य, उपभोग्य वस्तू आणि आवश्यक उपकरणांची जबाबदारीही संस्थेचीच असेल. महापालिकेकडून मात्र श्वान संतती नियमन केंद्र, नेहरूनगर दवाखाना आणि ट्रॉमा केअर सेंटरची जागा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक श्वानासाठी स्वतंत्र पिंजरा, श्वान पकडण्याचे पथक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षाव्यवस्थाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी महापालिका आणि संस्थेमध्ये करारनामा करून काम सुरू करण्यास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे.
मोकाट श्वानांना पकडण्यासाठी महापालिकेने चार वाहने भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक वाहनावर दोन मजूर नियुक्त केले जाणार असून, तीन वर्षांसाठी दोन एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक वाहनाला दररोज १२ तासांसाठी ४ हजार ७८० रुपये शुल्क दिले जाणार आहे. या चार वाहनांसाठी तीन वर्षांत एकूण २ कोटी ६ लाख ३४ हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. शहरातील दहा क्षेत्रीय कार्यालयांकडून मागणी आल्यानुसार ही वाहने निश्चित दराने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
दरम्यान, मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवरून महापालिका सभागृहात नगरसेवकांचा रोषही पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेपूर्वी या प्रश्नावर आंदोलन केले होते. यापूर्वी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांना कुत्र्याची प्रतीकात्मक बाहुली भेट देत या समस्येकडे लक्ष वेधले होते. नागरिकांकडूनही तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.
महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीची प्रक्रिया वेगाने राबवली जात असून आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवले जात आहे. श्वान पकडण्यासाठी वाहने आणि मजूर पुरवठ्याची एजन्सी नेमण्यात आली आहे. तसेच कुत्री निवारा केंद्रांसाठी जागा अंतिम करण्याची कार्यवाही सुरू असून, आगामी काळात मोकाट श्वानांच्या समस्येवर अधिक प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे.