लाडक्या बहिणींना मोठी बातमी! 92 लाख महिला अपात्र, आता ‘इतक्याच’ महिलांना मिळणार योजनेचा लाभ


मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी प्रक्रियेनंतर योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल 92 लाखांनी कमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

योजना सुरू झाल्यानंतर सुमारे 2 कोटी 48 लाख महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. आता ही संख्या 1 कोटी 65 लाख 66 हजार 164 इतकी राहिल्याची माहिती आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली असून, पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केल्याने राज्यभरातून योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, कालांतराने लाभार्थ्यांची पात्रता आणि योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया करण्यात आली.

या प्रक्रियेदरम्यान विविध निकषांची तपासणी करण्यात आली. उत्पन्नाची मर्यादा, सरकारी नोकरी, इतर शासकीय योजनांचा लाभ, कुटुंबातील सदस्यांची पात्रता तसेच ई-केवायसीशी संबंधित त्रुटी अशा कारणांमुळे काही लाभार्थी अपात्र ठरल्याची शक्यता आहे. पात्र महिलांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचावा आणि सरकारी निधीचा गैरवापर टाळता यावा, हा पडताळणीमागील उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, तब्बल 92 लाख लाभार्थी कमी झाल्याने योजनेच्या पडताळणी प्रक्रियेबाबत राजकीय वर्तुळातही चर्चा होण्याची शक्यता आहे. या योजनेवर राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो.

लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी?

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का, याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. दोन हप्ते एकत्र दिल्यास पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतात. मात्र, दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही.

ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने, पुढील हप्ता केवळ पात्र ठरलेल्या आणि ई-केवायसी पूर्ण असलेल्या महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!