आज महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता! ‘या’ 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी


पुणे : महाराष्ट्रात पावसाचा लहरीपणा कायम असून, काही भागांत पावसाची प्रतीक्षा असताना काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण

देशातील मान्सूनचा आस सध्या पंजाबमधील फिरोजपूरपासून डेहरादून, शाहजहानपूर, वाराणसी, देहरी, कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्र आणि पुढे दिघा मार्गे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

या हवामान प्रणालीपासून गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत तयार झालेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवर आलं आहे. झारखंड आणि पश्चिम बंगाल परिसरात सक्रिय असलेली ही प्रणाली सध्या वायव्य दिशेने सरकत असून, आज तिची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.

सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट

मंगळवारी सकाळपर्यंतच्या नोंदीनुसार अकोला येथे राज्यातील सर्वाधिक 32.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वात कमी 17.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आजच्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सोलापूर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे.

त्यामुळे या सहा जिल्ह्यांतील नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवावं आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना आवश्यक ती काळजी घ्यावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!