नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के! हादरे जाणवताच नागरिकांमध्ये घबराट; सततच्या धक्क्यांनी चिंता वाढली

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पेठ तालुक्यात बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळच्या वेळी अनेक नागरिक घराबाहेर पडत असताना अचानक धक्के जाणवल्याने परिसरात घबराट पसरली.

मात्र, या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. गेल्या काही काळापासून नाशिक जिल्ह्यात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.


महिनाभरात अनेकदा भूकंपाचे धक्के
गेल्या महिनाभरात नाशिक जिल्ह्यात 5 ते 6 वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगितलं जात आहे. वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे हादरे
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री सुमारे 7.40 वाजता जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 इतकी नोंदवण्यात आली.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कांगडा जिल्ह्यातील दारिणी धार परिसरात होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. भूकंपानंतर जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.