अजित पवार गटाला मोठा झटका! बड्या नेत्यानं सोडली साथ; राजकीय वर्तुळात खळबळ


मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

एकाचवेळी उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने बार्शी तालुक्यातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

निरंजन भूमकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बार्शी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र आता त्यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत 15 नगरसेवकही शिंदे गटात दाखल झाले आहेत.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटात विविध पक्षांतील नेत्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा झाली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांपैकी सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडे तीन खासदार राहिले, तर शिंदे गटातील खासदारांची संख्या वाढली.

आता महायुतीतील घटक पक्षांमधूनही शिंदे गटात पक्षप्रवेश होत असल्याने आगामी काळात महायुतीतील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे. वैराग नगरपंचायतीतील या पक्षप्रवेशावर अजित पवार गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!