पुण्यात आजपासून 14 दिवस जमावबंदी! रील्सच्या नादात ‘ही’ चूक केली तर पडेल महागात

पुणे : पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने 18 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. आगामी सण, राजकीय कार्यक्रम, आंदोलने आणि संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37 (1)(3) अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून ते 31 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

पाच किंवा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई
या कालावधीत पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहरात सलग 14 दिवस जमावबंदीचे निर्बंध राहणार आहेत.


याच काळात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांसाठी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम नियोजित असल्याने या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी मिळणार का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
शस्त्रे, आक्षेपार्ह घोषणा आणि दाहक वस्तूंवर बंदी
आदेशानुसार शस्त्रे, लाठ्या, तलवारी, दाहक किंवा स्फोटक पदार्थ तसेच दगड किंवा फेकण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू जवळ बाळगण्यास अथवा जमा करण्यास मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय कोणत्याही व्यक्तीचे चित्र, पुतळा किंवा प्रतीकात्मक प्रेत प्रदर्शित करून त्याचे दहन करण्यासही बंदी असेल.
सोशल मीडियावरील रील्सवरही पोलिसांची नजर
गुन्हेगारांचे व्हिडीओ किंवा रील्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करणे, त्यातून दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे यावर कारवाई होऊ शकते.
तसेच जातीय सलोखा बिघडवणारी भाषणे, आक्षेपार्ह घोषणा, भडक गाणी, वादग्रस्त फलक किंवा चित्रे प्रदर्शित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांसारखे सण तसेच विविध राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम या काळात होणार असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.