‘रस्ते आहेत तर अपघात होणारच!’ चिमुकल्याच्या मृत्यूनंतर आमदारांचं वक्तव्य; संतप्त नागरिकांचा रोष


पुणे : म्हाळुंगे-नांदे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात रिषभ पाटोळे या चिमुकल्याचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत असतानाच भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या वक्तव्याने संताप आणखी वाढला आहे.

घटनेनंतर आमदार मांडेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांना जाब विचारला. रस्त्यावरील खड्डे आणि अपघाताच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी जबाबदारी कोण घेणार, असा सवाल केला. त्यावर मांडेकर यांनी, “रस्ते आहेत तर अपघात होणारच. ज्याची मोठी गाडी आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो,” असं वक्तव्य केलं.

या वक्तव्यामुळे आमदारांवर टीकेची झोड उठली आहे. विशेष म्हणजे, या अपघातात ट्रकचा थेट धक्का नसतानाही बावधन पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था करणाऱ्या संबंधित यंत्रणांवर कारवाई न करता केवळ चालकावर गुन्हा दाखल केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना मांडेकर यांनी आपण गेल्या दोन वर्षांपासून विधानसभेत रस्त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत असल्याचं सांगितलं. “तुम्ही पत्रकार आहात, तर मी जबाबदार आमदार आहे,” असंही त्यांनी म्हटलं. सरकार आहे, आपण तरी काय करणार, अशा आशयाची भूमिका त्यांनी मांडल्यानेही प्रश्न उपस्थित झाले.

दरम्यान, अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. रिषभच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच संबंधित अधिकारी आणि यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. आमदार मांडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचं आश्वासन दिलं आहे. आता या प्रकरणात प्रशासन नेमकी काय कारवाई करतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!