दिल्लीतून मोठा राजकीय निर्णय; योगींच्या उत्तर प्रदेशची धुरा विनोद तावडेंकडे, 2027 निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय संघटनेत मोठे फेरबदल करत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, भाजपने निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे संकेत यातून मिळत आहेत.
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली राज्य मानले जाते. केंद्रातील सत्तेच्या समीकरणांमध्येही या राज्याची भूमिका निर्णायक असते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवणे, संघटन अधिक मजबूत करणे, विविध सामाजिक गटांशी संवाद वाढवणे आणि निवडणुकीसाठी पक्षाची यंत्रणा सज्ज ठेवणे, ही मोठी जबाबदारी आता तावडे यांच्या खांद्यावर असणार आहे.

भाजप नेतृत्वाचा तावडे यांच्यावर असलेला विश्वास त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीतून दिसून येतो. 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी त्यांनी विविध राज्यांतील आमदार आणि मित्रपक्षांशी समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम केले होते. त्यानंतर उपराष्ट्रपती निवडणुकीतही एनडीएच्या उमेदवारासाठी त्यांनी प्रभावी रणनीती आखली होती.


हरियाणा आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये प्रभारी म्हणून काम करताना तावडे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. बिहारमध्ये एनडीएला राजकीयदृष्ट्या बळकटी मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या विजयामागेही त्यांच्या रणनीतीची चर्चा झाली होती.
याशिवाय ‘संघटन पर्व’ सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय प्रभारी म्हणून त्यांनी विक्रमी सदस्य नोंदणी मोहीम यशस्वी केली. केवळ काही दिवसांत कोट्यवधी सदस्य जोडण्याचा विक्रम भाजपने केला होता. देशभरातील विधानसभा निवडणुका, मुख्यमंत्री निवड प्रक्रिया, मंत्रिमंडळ विस्तार, तसेच विविध राष्ट्रीय मोहिमांच्या नियोजनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील संघटनात्मक निवडणुकांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारीही यापूर्वी तावडे यांनी सांभाळली होती. त्यामुळे राज्यातील भाजपची अंतर्गत रचना, स्थानिक नेतृत्व आणि राजकीय परिस्थिती यांची त्यांना चांगली माहिती असल्याचे मानले जाते. याच अनुभवाच्या जोरावर पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, भाजपने गुजरातसाठी तरुण चुग आणि पंजाबसाठी सतीश पुनिया यांची नियुक्ती केली असली, तरी सर्वाधिक चर्चा उत्तर प्रदेशच्या निर्णयाची होत आहे. आगामी निवडणूक केवळ राज्यापुरती मर्यादित नसून 2029 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात असल्याने भाजपने संघटन आणि निवडणूक व्यवस्थापनात अनुभवी चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे.
महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवणाऱ्या विनोद तावडे यांच्यासाठी ही नियुक्ती मोठी राजकीय संधी मानली जात आहे. उत्तर प्रदेशातील भाजपची संघटनात्मक ताकद कायम राखणे आणि विजयाची मालिका सुरू ठेवणे, हेच आता त्यांच्या नेतृत्वासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.