‘माझ्याकडून चूक झाली…’; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा यू-टर्न, २०१४च्या निवडणुकीबाबतही मोठं वक्तव्य

मुंबई : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे. शनिवारी चव्हाण यांनी मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते आणि तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दिला होता, असा दावा केला होता. मात्र, या वक्तव्यावर आता त्यांनी स्वतःच स्पष्टीकरण देत ‘माझ्याकडून चूक झाली’ असं म्हटलं आहे.
चव्हाण यांनी यापूर्वी केलेल्या दाव्यानुसार, गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये आणण्याबाबत हालचाली सुरू होत्या. सोनिया गांधी यांची मुंडेंच्या पक्षप्रवेशाला तयारी होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्याला विरोध केल्याने हा प्रवेश होऊ शकला नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. या दाव्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली होती.

यानंतर चव्हाण यांना त्यांच्या दाव्याबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या अधिकारांबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी आपली चूक मान्य केली. संसदीय परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीला पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, हा निर्णय पक्षाध्यक्षांचा असतो. तर एखाद्या व्यक्तीला मंत्री करण्याचा निर्णय पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री घेतात. या दोन्ही बाबी सांगताना आपल्याकडून चूक झाली, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.


दरम्यान, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांच्या राजकीय प्रवासाला वेगळं वळण मिळालं असतं का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांच्या ‘मुंडे आज काँग्रेसमध्ये असते तर जिवंत असते का?’ या वक्तव्याबाबत चव्हाण यांना विचारण्यात आलं. मात्र, या मुद्द्यावर अधिक भाष्य करणं त्यांनी टाळलं. मुंडेंचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांच्यासारखा मोठं राजकीय भवितव्य असलेला नेता अचानक गमावल्याने सर्वांनाच धक्का बसला, असं चव्हाण म्हणाले.
विशेष म्हणजे, मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर २०१४ची निवडणूक काँग्रेसने जिंकली असती, असा दावा चव्हाण यांनी केला. गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्याला मोठा आदर असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुंडेंच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाचा जुना राजकीय अध्याय पुन्हा चर्चेत आला असून, चव्हाण यांच्या ‘माझ्याकडून चूक झाली’ या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं आहे.