शनिशिंगणापूरमध्ये ‘तेलकांड’चा स्फोट? तक्रार थेट तुकाराम मुंढेंपर्यंत; आता FDAच्या धाडीची चर्चा

अहमदनगर : भेसळखोरांवर धडक कारवाई करून राज्यभर चर्चेत आलेले FDA आयुक्त तुकाराम मुंढे आता शनिशिंगणापूरकडे मोर्चा वळवणार का, अशी चर्चा रंगली आहे. शनिदेवांच्या मूर्तीवर अभिषेकासाठी विकले जाणारे तेल भेसळयुक्त असल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रार समोर आल्यानंतर भाविकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय श्रीराम संघाने देवस्थान ट्रस्टकडे दिलेल्या निवेदनात मंदिर परिसरात विक्री होणाऱ्या तेलाची गुणवत्ता संशयास्पद असल्याचा दावा केला आहे. लाखो भाविक श्रद्धेने खरेदी करत असलेल्या तेलामध्ये भेसळ होत असल्यास हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून भावनांशी खेळ असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शनिशिंगणापूरमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. शनिदेवांना तेल अर्पण करण्याची परंपरा असल्याने मंदिर परिसरात तेल विक्रीचा मोठा व्यवसाय उभा राहिला आहे. याच व्यवसायात काहीजण निकृष्ट किंवा बनावट तेल विकत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीत या प्रकारामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.


विशेष म्हणजे, मंदिर प्रशासनाने यापूर्वीही तेलाच्या गुणवत्तेबाबत तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आता FDAकडून नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAने गेल्या काही महिन्यांत राज्यभर धडक कारवाया केल्या आहेत. मोठ्या हॉटेल्स, मिठाई उत्पादक, दुग्धव्यवसाय, पनीर-खवा उत्पादक तसेच औषध कंपन्यांवर कारवाई करत अनेक गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. काही कंपन्यांचे परवानेही रद्द करण्यात आले. त्यामुळे भेसळविरोधी मोहिमेमुळे सर्वसामान्यांमध्ये FDAबद्दल विश्वास वाढला आहे.
याच पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूरमधील तेलप्रकरणीही मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांचा पर्दाफाश होणार का, FDAचे पथक मंदिर परिसरात धडकणार का आणि तक्रारीमागील सत्य काय आहे, याची उत्सुकता आता राज्यभरातील भाविकांना लागली आहे.