एका ‘मेसेज’ने सुरू झाला वाद, मध्यरात्री घराबाहेर पडले अन् थेट सांगलीत मृतदेह सापडला; पुण्यातील ५९ वर्षीय व्यक्तीच्या खुनाचा थरारक उलगडा


पुणे : मोबाइलवर पाठविलेल्या एका संदेशामुळे सुरू झालेल्या वादाचे रुपांतर थेट अपहरण आणि खुनात झाल्याची धक्कादायक घटना पुणे-सांगली मार्गावर उघडकीस आली आहे. नात्यातील महिलेला संदेश पाठविल्याच्या कारणातून गोविंद माधवराव उपासे (वय ५९, रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) यांचे पुण्यातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना सांगली जिल्ह्यात नेऊन मारहाण करून ठार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

तातोबा उर्फ वैभव अर्जुन केंगार (वय २८, सध्या आंबेगाव बुद्रुक, मूळ बेळंखी, ता. जत, जि. सांगली), राहुल राजेंद्र बाबर (वय २५, रा. बेळंखी, ता. जत) आणि रोहन जयसिंग सावंत (वय २३, रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मृताचे पुत्र रोहित गोविंद उपासे (वय ३५, रा. तपोधाम, वारजे माळवाडी) यांनी याबाबत आंबेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी रात्री गोविंद उपासे मित्रांसोबत धायरी परिसरात जेवायला गेले होते. रात्री आठच्या सुमारास जेवण झाल्यानंतर ते घरी परतले. मात्र, मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवर आरोपींचा संपर्क आला. मित्रांसोबत जाऊन येतो, असे सांगून उपासे दुचाकी घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर ते परतलेच नाहीत.

बराच वेळ उलटूनही वडील घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. अखेर ११ ऑगस्ट रोजी मुलगा जयवंत उपासे याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्याचदरम्यान सांगली शहरातील शामरावनगर परिसरातील घोड्याच्या तबेल्याजवळ भांडण सुरू असल्याची माहिती १२ ऑगस्ट रोजी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केंगार, बाबर आणि सावंत यांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींकडून पुण्यातून उपासे यांचे अपहरण केल्याची माहिती समोर आली. त्यांना मारहाण केल्यानंतर कडेगाव परिसरातील कालव्यात मृतदेह टाकल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. उपासे यांची दुचाकी कात्रजमधील आंबेगाव परिसरात सोडून दिल्याची माहितीही तपासात मिळाली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता उपासे यांना मारहाण करून मोटारीतून आरोपी घेऊन जात असल्याचे दृश्य आढळले. त्यामुळे अपहरणाचा धागा आंबेगाव परिसराशी जोडला गेला. पुढील तपासासाठी कडेगाव पोलिसांकडील गुन्हा आंबेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

“नात्यातील एका महिलेला मोबाइलवर संदेश पाठविल्याने झालेल्या वादातून उपासे यांचा खून केल्याची माहिती तपासात मिळाली आहे,” अशी माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे पुढील तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!