पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी! स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या काय बदललं


पुणे : पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील (ATF) विंडफॉल टॅक्समध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शनिवारपासून या नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

नव्या निर्णयानुसार, डिझेलवरील विंडफॉल टॅक्स प्रति लिटर ₹25.5 वरून ₹24 करण्यात आला आहे. पेट्रोलवरील कर ₹3.5 वरून थेट शून्य करण्यात आला आहे. तर विमान इंधनावरील कर ₹22 वरून ₹19.5 प्रति लिटर करण्यात आला आहे.

सरकारकडून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींचा आढावा घेऊन दर पंधरा दिवसांनी विंडफॉल टॅक्समध्ये बदल केला जातो. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्यानंतर भारतीय कंपन्यांना निर्यातीतून मिळणारा अतिरिक्त नफा नियंत्रित करण्यासाठी हा कर लागू करण्यात आला होता.

याआधी 3 ऑगस्ट रोजी सरकारने विंडफॉल टॅक्समध्ये मोठी वाढ केली होती. त्यावेळी डिझेलवरील कर ₹15.5 वरून ₹25.5 प्रति लिटर, तर ATF वरील कर ₹14.5 वरून ₹22 प्रति लिटर करण्यात आला होता. पेट्रोलवरील करही ₹2.5 वरून ₹3.5 करण्यात आला होता. मात्र, आता पेट्रोलवरील कर पूर्णपणे हटवण्यात आला आहे.

विंडफॉल टॅक्समधील या कपातीचा देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमतींवर थेट परिणाम होणार नाही. हा कर मुख्यतः निर्यात होणाऱ्या पेट्रोलियम उत्पादनांवर लागू होतो. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फायदा तेल कंपन्या आणि रिफायनरींना होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशांतर्गत इंधनाचा पुरवठा सुरळीत राहावा आणि कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर इंधनाची निर्यात करू नये, या उद्देशाने सरकारकडून या कराच्या माध्यमातून निर्यातीवर नियंत्रण ठेवले जाते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!