‘ऑपरेशन विदर्भ’ची सुरुवात? दर्यापूरचा काँग्रेस गड खालसा; नगराध्यक्षांसह 19 नगरसेवक शिंदेसेनेच्या गळाला

अमरावती : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडली असून विदर्भातील काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह तब्बल 19 नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे विदर्भातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकारातून पार पडल्याने त्याला अधिक राजकीय वजन प्राप्त झाले आहे. दर्यापूर नगर परिषदेतील काँग्रेसचे प्रमुख चेहरे एकाचवेळी शिवसेनेत दाखल झाल्याने स्थानिक पातळीवर काँग्रेससमोर संघटन टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या राजकीय घडामोडीत केवळ नगरसेवकांचाच समावेश नाही. अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके, त्यांचे समर्थक, प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष तसेच कर्नाटकातील बेळगाव परिसरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे हा पक्षप्रवेश केवळ दर्यापूरपुरता मर्यादित नसून विदर्भ आणि सीमाभागातील राजकारणावर परिणाम करणारा मानला जात आहे.


यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत विकासाचे राजकारण पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. दर्यापूरच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांसाठी महायुती सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढता ओढा हा सरकारच्या कामावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा पुरावा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात सुरू असलेल्या संघटन विस्ताराला या पक्षप्रवेशामुळे मोठी चालना मिळाल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विदर्भात आपली ताकद वाढवण्याची मोहीम वेगाने सुरू केल्याचे संकेत या घडामोडीतून मिळत आहेत. दर्यापूरमधील हा राजकीय भूकंप पुढील काही दिवसांत आणखी पक्षांतरांची मालिका सुरू करतो का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.