‘20 कंपन्या जाणार?’ चाकण MIDC संकटावर सुनेत्रा पवारांचा तातडीचा हस्तक्षेप; हजारो नोकऱ्या वाचवण्यासाठी प्रशासनाला दिले अलर्ट आदेश


पुणे : चाकण एमआयडीसीतील वाढती वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, पाणी-वीज पुरवठ्याच्या अडचणी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे तब्बल 20 उद्योग स्थलांतराच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासन, एमआयडीसी अधिकारी आणि उद्योजकांशी संवाद साधत परिस्थितीवर तातडीने लक्ष केंद्रित केले आहे.

चाकण औद्योगिक पट्टा हा राज्यातील सर्वात महत्त्वाच्या उत्पादन केंद्रांपैकी एक मानला जातो. मर्सिडीज-बेंझ, स्कोडा, फोक्सवॅगन, ह्युंदाईसारख्या मोठ्या कंपन्यांसह शेकडो लघु-मध्यम उद्योग येथे कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे मालवाहतुकीचा वेळ वाढला, उत्पादन खर्चात वाढ झाली आणि उद्योगांना दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार उद्योजकांकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी चाकण नागरी कृती समिती तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. लवकरच उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नावर राज्यातील राजकारणही तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी 20 कंपन्यांच्या संभाव्य स्थलांतराबाबत चिंता व्यक्त करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत चाकणमधील समस्या मान्य केल्या आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना आवश्यक उपाययोजनांचे निर्देश दिल्याचे सांगितले. तसेच एकही उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुनेत्रा पवार यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. चाकणच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी रस्ते, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योग स्थलांतराचा प्रश्न केवळ कंपन्यांपुरता मर्यादित नसून हजारो कामगारांच्या रोजगाराशी जोडलेला असल्याने आता सरकारच्या पुढील निर्णयांकडे संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!