राखी बांधायची की सोनं घ्यायचं? रक्षाबंधनच्या तोंडावर सोने-चांदीच्या दरांची ‘यू-टर्न’; आजचे भाव पाहून खरेदीदार खुश!

पुणे : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी बाजारातून दिलासादायक संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढणाऱ्या मौल्यवान धातूंच्या दरात आता सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. शुक्रवारी नफावसुलीचा दबाव वाढल्याने सोन्या-चांदीच्या किमती खाली आल्या. अलीकडच्या जोरदार तेजीमुळे गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्यास सुरुवात केल्याने बाजारात ही करेक्शन पाहायला मिळत आहे.
देशांतर्गत बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ७४० रुपयांनी घसरून १ लाख ५२ हजार ८६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३९ हजार ६२७ रुपये, तर चांदीचा दर २ लाख ३४ हजार ५७० रुपये प्रति किलो आहे. प्रमुख शहरांमध्ये दिल्ली येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,३२० रुपये आणि २२ कॅरेटचा १,३९,६२७ रुपये आहे. मुंबईत हे दर अनुक्रमे १,५२,५४० आणि १,३९,७४६ रुपये, बंगळुरूमध्ये १,५२,५७० आणि १,३९,८५६ रुपये, कोलकात्यात १,५२,२५० आणि १,३९,५६३ रुपये, तर हैदराबादमध्ये १,५२,७०० आणि १,३९,९७५ रुपये आहेत. प्रत्यक्ष दागिन्यांच्या किमतीत जीएसटी आणि मेकिंग चार्ज वेगळे लागू होऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव दिसत आहे. सोन्याचा भाव ०.९२ टक्क्यांनी घसरून ४,३७९ डॉलर प्रति औंस, तर चांदी १.३४ टक्क्यांनी घसरून ६४.१२५ डॉलर प्रति औंस झाली आहे. गुरुवारी सोन्याने जूननंतरचा उच्चांक गाठला होता; मात्र त्यानंतरच्या घसरणीने बाजारातील तेजीला काहीसा ब्रेक मिळाला. सध्याच्या घसरणीमागे केवळ नफावसुलीच नाही, तर जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचाही प्रभाव असल्याचे दिसत आहे.


दरांवर अमेरिकेतील महागाईची आकडेवारी, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, डॉलर निर्देशांक आणि कच्च्या तेलाच्या किमती यांचा परिणाम होत आहे. अमेरिकेतील महागाईचा दबाव तुलनेने नियंत्रित राहिल्याने सप्टेंबरमधील फेडच्या व्याजदरवाढीची शक्यता कमी झाल्याचे बाजारात मानले जात आहे; मात्र गुंतवणूकदारांची नफावसुली सुरू झाल्याने सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे.
बाजार तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत बाजारात १ लाख ५२ हजार ते १ लाख ५२ हजार ५०० रुपये ही सोन्यासाठी महत्त्वाची आधारपातळी ठरू शकते. या पातळीवर खरेदीचा आधार मिळतो का, याकडे बाजाराचे लक्ष आहे. मात्र, आगामी आर्थिक निर्णय, डॉलरची दिशा आणि जागतिक भू-राजकीय परिस्थिती पाहता पुढील काळात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठे चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे सणासुदीच्या खरेदीदारांसाठी सध्याची घसरण संधी ठरेल की आणखी स्वस्त दरांची वाट पाहावी लागेल, हे पुढील बाजारच ठरवणार आहे.