जेवणात झोपेच्या गोळ्या, प्रायव्हेट पार्टवर विजेचा शॉक; प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा जीव घेतल्याचा आरोप, पोलिसांसमोर रचला चोरीचा बनाव

नवी दिल्ली : दिल्लीत पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला संपवण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचल्याचा आरोप असून, हत्येनंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात चोरी झाल्याचा बनावही करण्यात आला. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि शवविच्छेदन अहवालामुळे पोलिसांसमोर या प्रकरणाचे धक्कादायक सत्य उघड झाले. या प्रकरणी पत्नी मंजू आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दक्षिण दिल्लीतील रतिया मार्ग परिसरात ही घटना घडली. मुन्ना लाल असे मृत व्यक्तीचे नाव असून मंजू ही त्याची पत्नी आहे. ९ ऑगस्टच्या रात्री मंजूने पतीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्याचा आरोप आहे. मात्र मुन्ना लालवर त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. त्यानंतर मंजूने प्रियकराच्या मदतीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे तपासात समोर आले.

आरोपींनी मुन्ना लालच्या प्रायव्हेट पार्टवर विजेचा शॉक दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्याच्यावर जोरदार मारहाण करण्यात आली. गंभीर मारहाणीमुळे मुन्ना लाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.


१० ऑगस्टच्या पहाटे मंजूने आरडाओरड सुरू केली. तिचा आवाज ऐकून शेजारी घरात पोहोचले. त्यावेळी मुन्ना लाल रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला. शेजाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि घराची झडती घेऊन महत्त्वाचे पुरावे गोळा केले. चौकशीदरम्यान मंजूने घरात चोर घुसल्याचा दावा केला. टेरेसवरून चोर घरात आले आणि चोरीच्या प्रयत्नाला विरोध करताना मुन्ना लालची त्यांच्यासोबत झटापट झाली, त्यात त्याची हत्या झाल्याचे तिने सांगितले.
मात्र पोलिसांना तिच्या कथनात विसंगती जाणवली. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पहाटे १.४५ वाजता मुखवटा घातलेली व्यक्ती घरात शिरताना आणि सुमारे ३.१५ वाजता बाहेर पडताना दिसली. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच वाढला.
यानंतर शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्यात आली. मुन्ना लालच्या प्रायव्हेट पार्टवर झालेली गंभीर दुखापत तसेच शरीरावरील मारहाणीच्या खुणा आढळल्याने चोरीच्या कथेला धक्का बसला. पोलिसांनी मंजूची पुन्हा कसून चौकशी केली असता ती घडलेला प्रकार सांगू लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मंजूने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर तिच्या प्रियकरासह इतर संशयितांना ताब्यात घेण्यात आले. हत्येमागील कारण, कटाची संपूर्ण पार्श्वभूमी आणि इतर साथीदारांची भूमिका याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.