डॉमिनोज पिझ्झावर FDAचा दणका! तपासणीत गंभीर त्रुटी; ५ आउटलेट्सचे परवाने निलंबित


पुणे : अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDAची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरात धडक कारवाईला सुरुवात झाली आहे.

मंगळवारी FDAने राज्यभरात विशेष मोहीम राबवत तब्बल १०४ आस्थापनांची तपासणी केली. या तपासणीत गंभीर त्रुटी आढळलेल्या डॉमिनोज पिझ्झाच्या तीन केंद्रांसह दोन धाब्यांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

याशिवाय २ आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा, तर ९५ हॉटेल्सना स्वच्छतेबाबत सुधारणा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

डॉमिनोज पिझ्झावर कारवाई

विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपर येथील आर सिटी मॉलमधील ज्युबिलन्ट फूड वर्क्स (डॉमिनोज पिझ्झा), तसेच सातारा जिल्ह्यातील मलकापूर येथील डॉमिनोज पिझ्झा आणि सफायर फूड इंडियाच्या केंद्रांवर कारवाई करण्यात आली.

तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने संबंधित केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.

‘या’ कारणांमुळे झाली कारवाई

हॉटेलमध्ये स्वच्छता आणि सॅनिटेशनचा अभाव
फ्रोझन अन्नपदार्थांची अयोग्य तापमानात साठवणूक
FSSAI परवाना दर्शनी भागात न लावणे
पेस्ट कंट्रोल व्यवस्थेत गंभीर त्रुटी
कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे
शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांची योग्य प्रकारे स्वतंत्र साठवणूक न करणे
भांडुपमधील दोन धाब्यांवरही कारवाई

भांडुप येथील मुंबई मेट्रो ढाबा आणि गुलसान द पंजाबी ढाबा येथेही गंभीर त्रुटी आढळून आल्या. शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगळे न ठेवणे तसेच अन्न साठवणुकीबाबत नियमांचे पालन न केल्याने या दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

तुकाराम मुंढेंचा कडक इशारा

या कारवाईनंतर FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत प्रशासन कोणतीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भेसळ, अस्वच्छता किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!