राष्ट्रवादीत पार्थ पवारांचा ‘गेम’ सुरू? आधी युवा संघटना, आता मुंबईवर नजर; बड्या नेत्यांच्या गटात खळबळ?


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या संघटनात्मक पातळीवर मोठ्या हालचाली सुरू असून, या घडामोडींच्या केंद्रस्थानी पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आली आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षातील संघटनात्मक फेरबदलांकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच काळात पार्थ पवार पक्षातील पदाधिकारी निवडीमध्ये सक्रिय भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्षपदासह महाराष्ट्र युवती आणि विद्यार्थी अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये पार्थ पवार यांचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. या नियुक्त्यांनंतर आता त्यांचे लक्ष पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाकडे वळल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. समीर भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर अद्याप कायमस्वरूपी नियुक्ती झालेली नाही. आता या पदासाठी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. झिशान सिद्दीकी हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबईतील पक्षसंघटनेवर पार्थ पवारांचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. या यादीत प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे होती; मात्र त्यांच्या नावांसमोर कोणतेही पद नमूद करण्यात आले नव्हते. यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेबाबत चर्चा रंगली होती. याच पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चाही झाली होती. तसेच काही वृत्तांमध्ये प्रफुल पटेल यांनी पार्थ पवार यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आता विद्यार्थी आणि युवती संघटनेतील नियुक्त्यांनंतर मुंबई अध्यक्षपदासाठीही पार्थ पवारांच्या जवळच्या व्यक्तीचे नाव पुढे येत असल्याने राष्ट्रवादीतील बदलत्या समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. झिशान सिद्दीकी यांच्या नावावर अंतिम निर्णय झाल्यास मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरातील पक्षसंघटनेत पार्थ पवारांची भूमिका अधिक मजबूत होऊ शकते. त्यामुळे मुंबई अध्यक्षपदाची ही नियुक्ती केवळ संघटनात्मक बदल ठरणार की राष्ट्रवादीतील नव्या ‘पॉवर सेंटर’चा संकेत देणार?, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!