स्वस्तात रेल्वेचा प्रवास अन् थेट केली चोरी; पुण्यातील प्रवाशांनी ट्रेनमधून लंपास केल्या 3 कोटींच्या ‘या’ वस्तू


पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यात प्रवाशांच्या सोयीसाठी दिले जाणारे बेडशीट, उशी, ब्लँकेट आणि टॉवेल मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून गेल्या पाच वर्षांत तब्बल 2 लाख 6 हजार 483 बेडरोल साहित्य गायब झाले असून, त्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे.

पुणे रेल्वे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, पुणे स्थानकातून दररोज सुमारे 30 गाड्यांना बेडरोलचा पुरवठा केला जातो. मात्र, प्रवासासाठी दिलेले हे साहित्य अनेक प्रवासी बॅगेत भरून घरी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे.

गेल्या पाच वर्षांतील चोरीची आकडेवारी

चादरी – 63,549
उशीचे कव्हर – 59,063
फेस टॉवेल – 57,202
ब्लँकेट – 15,043
उशा – 11,626

या चोरीमुळे गहाळ झालेल्या साहित्याची किंमत 2 कोटी 81 लाख 76 हजार 89 रुपये इतकी आहे. रेल्वेच्या नियमानुसार ही रक्कम संबंधित खासगी ठेकेदाराच्या बिलातून वसूल केली जाते.

मात्र, या प्रकाराचा सर्वाधिक फटका बेडरोल सेवा देणाऱ्या कामगारांना बसत असल्याची बाब समोर आली आहे. ठेकेदारांकडून नुकसानभरपाईची रक्कम अनेकदा संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल केली जात असल्याने, प्रवाशांच्या चुकीची शिक्षा रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भोगावी लागत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!