सीमेवर जवान पती, घरात CCTV… तरीही टळला नाही रक्तरंजित शेवट; 4 वर्षांच्या चिमुकलीसमोर आजोबांनी घेतला आईचा जीव


मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील मकरोनिया परिसरातील गायत्री नगर येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. सीमा सुरक्षा दलात (BSF) देशसेवा करणारा पती सीमेवर तैनात असताना घरात सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा शेवट थेट हत्येत झाला. निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) असलेल्या सासऱ्याने आपल्या 36 वर्षीय सुनेवर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असून, ही संपूर्ण घटना अवघ्या चार वर्षांच्या नातीसमोर घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मृत सविता दीक्षित या आपल्या दोन मुलींसह सासरच्या घरी राहत होत्या. त्यांचे पती देवेश दीक्षित हे बीएसएफमध्ये कार्यरत असून सध्या पश्चिम बंगालमध्ये देशसेवा बजावत आहेत. घरातील सततचे वाद, किरकोळ कारणांवरून होणारी भांडणे आणि वाढता तणाव यामुळे देवेश यांनी काही महिन्यांपूर्वी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. मात्र, हे कॅमेरेही रक्तरंजित घटना रोखू शकले नाहीत.

मंगळवारी सकाळी सविता आपल्या मोठ्या मुलीला शाळेत सोडून घरी परतल्या. त्यानंतर सासू आणि सविता यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वादाचा आवाज ऐकून खाली असलेले 65 वर्षीय रामनरेश दीक्षित वर आले. संतापाच्या भरात त्यांनी हातातील चाकूने सविता यांच्यावर पाठीमागून हल्ला केल्याचा आरोप आहे. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करूनही त्यांना गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या भयावह घटनेदरम्यान घरात उपस्थित असलेल्या चार वर्षांच्या धाकट्या मुलीने आपल्या आईवर होत असलेला जीवघेणा हल्ला डोळ्यांसमोर पाहिला. घाबरलेली चिमुकली एका कोपऱ्यात बसून रडत होती, तर घरात रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह पडलेला होता. शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून तातडीने धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.

मकरोनिया पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपीच्या हातांवर रक्ताचे डाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून घरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासासाठी जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, सविता यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार, या हत्येत केवळ सासरेच नव्हे तर सासू आणि जेठ यांचाही सहभाग असू शकतो. काही दिवसांपूर्वी सविता यांना मारहाण करण्यात आली होती. त्या मारहाणीत त्यांच्या दोन्ही हातांना फ्रॅक्चर झाले होते, असा दावाही त्यांनी केला आहे.

निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर स्वतःच्या सुनेची हत्या केल्याचा आरोप झाल्याने या घटनेने सागर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी चार वर्षांच्या चिमुकलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, कौटुंबिक वाद, सीसीटीव्ही फुटेज आणि नातेवाईकांनी केलेले आरोप या सर्व बाबींचा तपास करून या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!