सुनेत्रा पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’! रुपाली चाकणकरांनंतर वैशाली नागवडेंकडे महिला राष्ट्रवादीची कमान

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नेतृत्वाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करत संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर मार्चपासून हे पद रिक्त होते. अनेक वरिष्ठ महिला नेत्यांची नावे चर्चेत असतानाही पक्षाने अनुभवी आणि संघटन उभारणीत सक्रिय असलेल्या वैशाली नागवडे यांच्यावर विश्वास ठेवला आहे.
रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर महिला संघटनेचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत पक्षात मोठी उत्सुकता होती. या पदासाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न केले होते. मात्र, अंतिम निर्णय घेताना सुनेत्रा पवार यांनी संघटनातील अनुभव, पक्षनिष्ठा आणि ग्रामीण भागातील प्रभावी कामगिरीला प्राधान्य दिल्याचे मानले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वैशाली नागवडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. महिला संघटन उभारण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस अशी विविध पदे सांभाळली आहेत. पक्षातील आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे.


त्यांचा राजकीय प्रवासही उल्लेखनीय राहिला आहे. १९९९ मध्ये जिल्हा बँकेच्या कामानिमित्त अजित पवार यांच्याशी त्यांचा संपर्क आला. त्यानंतर २००२ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. २००५ मध्ये महानंदा दूध संघाच्या संचालकपदी, २००७ मध्ये दौंड पंचायत समिती सदस्य, २००९ मध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षपदी त्यांनी जबाबदारी सांभाळली. २०१३ मध्ये त्या महानंदा दूध संघाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. त्याच वर्षी उत्तर प्रदेशातील IVRI संस्थेच्या संचालकपदीही त्यांची नियुक्ती झाली.
२०१७ आणि २०२० मध्ये त्यांनी राहू-खामगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पक्षात रुपाली चाकणकर यांच्या काही भूमिकांवर त्यांनी उघडपणे मतभेद व्यक्त केल्याने त्या अनेकदा चर्चेत आल्या होत्या. आता त्याच चाकणकर यांच्या जागी त्यांच्याकडे महिला संघटनेची धुरा आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महिला संघटनेचा विस्तार आणि राज्यभर पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी आता नागवडे यांच्या खांद्यावर असणार आहे. महिला कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणे, जिल्हानिहाय संघटन मजबूत करणे आणि पक्षाची महिला आघाडी अधिक प्रभावी बनवणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हाने असतील. सुनेत्रा पवार यांच्या या निर्णयाकडे केवळ नियुक्ती म्हणून नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेच्या नव्या राजकीय रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे.