दौंडच्या माजी उपसरपंचाच्या भरधाव फॉर्च्युनरचा कहर! शेवाळवाडी-थेऊर फाटा मार्गावर 10 ते 15 वाहनांना धडक; 6 जण जखमी

पुणे : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (3 ऑगस्ट) सायंकाळी भरधाव फॉर्च्युनरने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना घडली. दौंड तालुक्यातील पाटस येथील माजी उपसरपंच राजवर्धन शितोळे याने भरधाव वेगात वाहन चालवत शेवाळवाडी ते थेऊर फाटा दरम्यान समोरून येणाऱ्या 10 ते 15 वाहनांना धडक दिली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
माहितीनुसार, MH 14 GA 6565 क्रमांकाची फॉर्च्युनर सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. वाहनचालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याची माहिती मिळताच लोणी काळभोर वाहतूक शाखेने तातडीने कारवाई केली.

महिला पोलीस हवालदार आरती खलसे, नाहीद शेख, पोलीस हवालदार विवेक जगताप आणि ट्रॅफिक वॉर्डन सागर राऊत यांनी थेऊर फाटा येथे वाहतूक रोखून संबंधित फॉर्च्युनर अडवली. मात्र, गाडी थांबल्यानंतरही चालक बाहेर येण्यास तयार नव्हता. अखेर महिला पोलिसांनी धाडस दाखवत त्याला गाडीबाहेर काढले आणि लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले.


या प्रकरणी राजवर्धन योगेंद्र शितोळे (रा. पाटस, ता. दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, लोणी काळभोर येथील गंगा गणेश कुंभार यांच्यासह अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. याशिवाय तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. कवडीपाट टोलनाक्याजवळ एका महिला आणि तिच्या लहान मुलीलाही दुखापत झाली आहे.
या धडकांमध्ये 10 ते 15 वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी वेळेत कारवाई करून वाहन अडवले नसते, तर आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आरोपीने मद्य किंवा अमली पदार्थांचे सेवन केले होते का, याचा तपास सुरू असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई आणि संबंधित कलमे वाढविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.