मुंडे भावंडांच्या ‘राजकीय एक्झिट’ चर्चेत नवा ट्विस्ट; करुणा मुंडेंचं थेट आव्हान – “बीडची जबाबदारी माझ्याकडे द्या!”

बीड : राज्यातील मुंडे कुटुंब पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार धनंजय मुंडे यांनी सलग दोन दिवसांत केलेल्या विधानांमुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या चर्चेला आता नवं वळण देत करुणा मुंडे यांनी दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका करत स्वतःला बीडच्या राजकारणासाठी पर्याय म्हणून पुढे केले आहे.
रविवारी एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी, “आता राजकारणातून एक्झिट घ्यावी, असं वाटतं,” अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर सोमवारी धनंजय मुंडे यांनीही, “या गलिच्छ राजकारणात राहू की नाही, असा प्रश्न मला पडतो,” असे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. दोन्ही भावंडांच्या या वक्तव्यांकडे संभाव्य राजकीय निवृत्तीचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दोघांनाही थेट लक्ष्य केले. “जर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना खरंच राजकारणातून बाहेर पडायचं असेल, तर त्यांनी बीडमधील जनतेसाठी जागा मोकळी करावी. त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः बीडमध्ये सभा घेण्यास तयार आहे. मात्र त्यानंतर जनतेने मला संधी द्यावी,” असे त्या म्हणाल्या.


करुणा मुंडे यांनी यावेळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारशाचाही उल्लेख केला. “मी गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालत जनतेसाठी काम करेन. सर्व समाजाला न्याय देणारे राजकारण करण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीवरही कठोर शब्दांत टीका केली. विविध समाजांतील हत्या आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये निवडक भूमिका घेतल्याचा आरोप करत, “मराठा समाजातील घटना असो, मुस्लिम समाजावरील हल्ले असोत किंवा इतर गंभीर प्रकरणे, प्रत्येक ठिकाणी समान संवेदनशीलता दिसली नाही. एका समाजापुरतं राजकारण करून जनतेचा विश्वास जिंकता येत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
“वंजारी समाजातील घटनेत मदतीची घोषणा केली, पण पीडितांना पूर्ण न्याय मिळवून देण्यात अपयश आलं. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि आता जनतेलाही बदल हवा आहे,” असेही करुणा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यांनंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध स्तरावर चर्चा रंगली असली, तरी दोघांनीही अद्याप राजकारणातून निवृत्तीबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र करुणा मुंडे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बीडच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, मुंडे कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.