राष्ट्रवादीत ‘यंग कार्ड’! रोहित पवारांच्या संकेतांनंतर शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक; पक्षात नव्या चेहऱ्यांना मोठी संधी


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत युवक, युवती आणि विद्यार्थी आघाडीची संपूर्ण रचना नव्याने उभी केली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी पक्षात मोठे बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता पक्षाने नव्या नियुक्त्या जाहीर करत तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

या नव्या नियुक्त्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत केली. विद्यार्थी आघाडीचे विद्यमान अध्यक्ष सुनील गव्हाणे आणि युवक आघाडीचे अध्यक्ष मेहबूब शेख यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पक्षाने नव्या नेतृत्वाची निवड केली आहे. विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे राज्यभरातील विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यावेळी पक्षाने युवक संघटनेच्या रचनेतही महत्त्वाचा बदल केला आहे. प्रथमच युवक आघाडीचे शहर आणि ग्रामीण असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. शहर युवक प्रदेशाध्यक्ष म्हणून विशाल शंकर वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे युवती आघाडीतही शहर आणि ग्रामीण अशी स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली असून शहर प्रदेशाध्यक्षपदी मनाली भिलारे, तर ग्रामीण प्रदेशाध्यक्षपदी अमृता कालदाते यांची निवड करण्यात आली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी अधिक प्रभावी संपर्क ठेवण्यासाठी ही नवी रचना करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे.

राज्यात सध्या कोणतीही मोठी निवडणूक नसली तरी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. बूथस्तरावरील संघटन मजबूत करणे, नव्या सदस्यांची नोंदणी वाढवणे, युवक आणि विद्यार्थ्यांना पक्षाशी जोडणे तसेच सोशल मीडियावर पक्षाची उपस्थिती वाढवणे, ही जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.

गेल्या काही महिन्यांत पक्षाच्या बैठका आणि कार्यक्रमांमध्ये तरुण नेतृत्वाला अधिक संधी देण्याचे संकेत सातत्याने दिले जात होते. रोहित पवार यांनीही संघटनेत बदल अपरिहार्य असल्याचे सूचित केले होते. आता त्या संकेतांनंतर पक्षाने प्रत्यक्षात मोठी संघटनात्मक पुनर्रचना करत नव्या चेहऱ्यांना पुढे आणले आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, हा केवळ पदाधिकाऱ्यांचा बदल नसून आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची संघटनात्मक रणनीती आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा आणि राज्यभरात संघटना अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता या नव्या टीमची कामगिरी आणि त्याचा पक्षाच्या आगामी राजकीय वाटचालीवर होणारा परिणाम महत्त्वाचा ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!