अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी पोलिसांची ‘ऑपरेशन प्रिव्हेन्शन’; काँग्रेसच्या घरांवर पहाटे धाडी, शहरात राजकीय तापमान वाढले


पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात शनिवारी सकाळपासूनच मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. संभाव्य आंदोलन, काळे झेंडे आणि निदर्शने रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच विशेष मोहीम राबवत युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमित शाह हे आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्याला काँग्रेसकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आधीच कडक पावले उचलली.

युवक काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल शिरसाट यांना सकाळी त्यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही रात्री उशिरा प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेण्यात आले. येरवडा आणि शहरातील इतर भागांतील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी राहुल शिरसाट यांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा रस्ता रोको होऊ नये, यासाठी संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेसने आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तयारी करण्यात आली. उत्सव हॉटेल चौक परिसरात सकाळपासून काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनीही निदर्शनाचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली.

या घडामोडींनंतर भाजपचे कार्यकर्तेही काँग्रेसच्या शहर कार्यालयाबाहेर जमू लागल्याने परिस्थिती आणखी संवेदनशील बनली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ सुरक्षा व्यवस्था वाढवली. शहरातील प्रमुख चौक, कार्यक्रमस्थळाकडे जाणारे मार्ग आणि संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

कटारिया महाविद्यालयात आयोजित पुरस्कार सोहळ्यासाठी बहुपदरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात असून डॉग स्कॉड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सीसीटीव्ही निरीक्षण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या धरपकडीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. विरोधकांनी ही कारवाई लोकशाही आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला असून, पोलिसांनी मात्र ही केवळ कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठीची प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याचे स्पष्ट केले आहे.

अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान पुण्यातील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून, दिवसाभरातील राजकीय घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!